#हिंदी बातम्या ��ेट
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 September 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दि��ांक – २६ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि. ****
· वैद्यकीय शिक्षण आणि व्यावसायिकांसाठी नियंत्रण संस्था म्हणून राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कार्यरत.
· वाढीव शुल्क घेणाऱ्या दवाखान्यांकडून पाच पट दंड वसूल करण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आदेश.
· आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी सोमवारपासून पुकारलेलं कामबंद आंदोलन स्थगित करावं - मुख्यमंत्र्यांचं आवाहन.
· प्रसिद्ध पार्श्वगायक एस पी बालसुब्रह्मण्यम यांचं निधन.
· राज्यात कोविडबाधितांची संख्या १३ लाख ७५७.
· मराठवाड्यात काल २९ कोविडग्रस्तांचा मृत्यू तर नवे एक हजार ६०८ रुग्ण.
आणि
· धनगर तसंच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन; कृषी विधेयकांनाही विरोध.
****
देशभरातल्या वैद्यकीय शिक्षण आणि व्यावसायिकांसाठी नियंत्रण संस्था म्हणून राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कालपासून कार्यरत झाला. याआधी कार्यरत असलेल्या भारतीय वैद्यकीय परिषदेची जागा हा आयोग घेणार आहे. डॉ सुरेशचंद्र शर्मा या आयोगाचे अध्यक्ष असतील, तीन वर्षांसाठी त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हा आयोग कार्यरत झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठ्या सुधारणांना प्रारंभ होणं, अपेक्षित आहे.
****
वैद्यकीय उपचारांसाठी वाढीव शुल्क घेणाऱ्या दवाखान्यांकडून पाच पट दंड वसूल करण्याचे आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. टोपे यांनी काल नागपूर इथं कोविड उपचारासंदर्भात आढावा घेतला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांसाठी असलेल्या सहाशे खाटांची संख्या एक हजारपर्यंत वाढवण्यात यावी अशी सूचना आरोग्य मंत्र्यांनी यावेळी केली. प्लाझ्मा उपचाराला प्रोत्साहन देण्यासाठी दर निश्चित करण्यात आले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी येत्या सोमवारपासून पुकारलेलं कामबंद आंदोलन स्थगित करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केलं आहे. आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यातल्या मंजुरीनुसार सेवांवर आधारित मोबदला मिळतो. त्यासोबत आता राज्य शासनानं आशा स्वयंसेविकांना दरमहा दोन हजार आणि गट प्रवर्तकांना दरमहा तीन हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून मोबदला देण्याचा नि��्णय घेतला आहे. या निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे. प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात गटप्रवर्तकांच्या कमी करण्यात आलेल्या मोबदल्याची मागणी केंद्र सरकारकडे नव्यानं करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी सॅनिटायझर, मास्क, हातमोजे, आदी साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
****
शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य असलेल्या ठिकाणी दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थितीतून सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत ही सूट देण्यात आली असून, दिव्यांग अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होणार नाही याची काळजी संबंधित विभागांनी घ्यावी, असंही याबाबत जारी शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
****
केंद्र सरकारनं संसदेत संमत केलेली तिन्ही कृषी सुधारणा विधेयकं राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करणारी असल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी केला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. शेतकरी विरोधी कायद्यांना काँग्रेस सर्वच पातळ्यांवर तीव्र विरोध करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या विधेयकांविरोधात काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ येत्या सोमवारी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.
****
प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचं काल चेन्नईत निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. कोविड संसर्ग झाल्यानं, त्यांच्यावर पाच ऑगस्टपासून चेन्नईतल्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमधून विविध भूमिका साकारलेल्या एस पींच्या गायन कारकिर्दीचा हा संक्षिप्त आढावा –
१६ भारतीय भाषांमधून ४० हजारांवर गाणी गायलेल्या एसपींनी, हिंदी चित्रपटात कमल हसन आणि सलमान खान यांचा आवाज म्हणून ओळख निर्माण केली. एक दुजे के लिए, सागर, अप्पूराजा, मैंने प्यार किया, पत्थर के फुल, साजन, हम आपके है कौन या चित्रपटांसह हं��्रेड डेज, द जंटलमन, सपने, रोजा आणि चेन्नई एक्सप्रेस आदी चित्रपटांतल्या नायकांसाठी त्यांनी गायलेली गाणी, खूप लोकप्रिय झाली. ५६ वर्षांच्या गायन कारकिर्दीसाठी एसपींना विविध राज्य सरकारं आणि संगीत संस्थांच्या अनेकविध पुरस्कारांसह सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तसंच पद्मभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. कोविड योद्ध्यांच्या कार्याला अभिवादन करणारं इलयाराजा यांनी संगीतबद्ध केलेलं ‘भारतभूमी’ हे तमिळ गीत एसपींनी गेल्या मे महिन्यात ध्वनिमुद्रीत केलं होतं. आपल्या चाहत्यांमध्ये ‘सिंगिंग मून’ या टोपण नावानं प्रसिद्ध असलेल्या या गायन चंद्राला त्याच्याच गाण्याच्या हिंदी रुपातली ही श्रद्धांजली...
****
राज्यात काल दिवसभरात आणखी १७ हजार ७९४ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १३ लाख ७५७ झाली आहे. राज्यभरात काल ४१६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ३४ हजार ७६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत नऊ लाख ९२ हजार ८०६ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ७२ हजार ७७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मुंबईत काल एक हजार ८७६ नव्या रुग्णांची नोंद झाली. नाशिक - एक हजार ४६८, ठाणे - एक हजार ६७१, सातारा ६२२, सांगली ६०८, रायगड ४७९, पालघर २५७, रत्नागिरी ११६, गोंदिया ३०८, गडचिरोली ८५, यवतमाळ ७६ तर वाशिम जिल्ह्यात नव्या ४९ रुग्णांची नो��द झाली.
****
मराठवाड्यात काल २९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार ६०८ रुग्णांची नोंद झाली.
लातूर जिल्ह्यात काल आठ बाधितांचा मृत्यू झाला, तर नव्या ३५८ रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात सात रुग्णांचा मृत्यू तर नवे ३५१ रुग्ण, परभणी जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू तर नवे ७६ रुग्ण, नांदेड आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी तीन रुग्णांचा मृत्यू तर अनुक्रमे २३२ आणि १८८ रुग्ण, बीड जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू तर नवे १९६ रुग्ण, उस्मानाबाद जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू तर नवे १६५ रुग्ण आढळले, तर हिंगोली जिल्ह्यात नव्या ४२ रुग्णांची नोंद झाली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात शून्य ते चौदा वर्षे वयोगटातल्या ज्या बालकांचे आई-वडील कोविड बाधित आहेत त्यांच्या संगोपनाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीकडून घेतली जात आहे. यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘बालसंगोपन कक्षा’चं उद्घाटन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आणि भाजपचे विधी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक मिलिंद पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आलं. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
कोविड-19 बाधीतांच्या कुटुंबातील जी बाल��ं संसर्गापासून दूर आहेत अशांचा घरगुती वातावरणात सांभाळ करणं त्यांना खेळ, मनोरंजन आणि समुदेशन करून त्या बालकांचं आई-वडिलांना कसलंही टेन्शन न राहता त्यांनी या संसर्गातून लवकरात लवकर मुक्त व्हावं या भावनेतून हा बालसंगोपन कक्ष सुरू करण्यात आला आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद
****
जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त काल औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शहरात ठिकठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आलं. उस्मानाबाद इथं भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पंडित उपाध्याय यांना आदरांजली वाहिली.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूरच्या दीक्षा भूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम दीक्षा स्मारक समितीनं रद्द केले आहेत. स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी ही माहिती दिली. १४ ऑक्टोबर आणि २५ ऑक्टोबर रोजी सर्व बांधवांनी आपल्या घरीच राहून बुद्ध वंदना घ्यावी आणि बाबासाहेबांना अभिवादन करावं, असं आवाहन समितीनं केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात आजपासून ३० सप्टेंबरपर्यंतच्या ‘जनता संचारबंदी’बाबत कोणताही आदेश पारित केला नसल्याचं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी स्पष्ट केलं आहे. जनता संचारबंदी` साठी प्रशासनाच्या स्तरावर कोणतीही सक्ती नसून, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने योग्य त्या उपाययोजना करणं अभिप्रेत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. प्रवासी वाहतुकीवरही प्रशासनानं कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
सध्या पोषण माह सुरू आहे. याअनुषंगानं बालकांना पोषक ठरणाऱ्या सालाच्या मूग दाळीच्या धिरड्यांची पाककृती सांगत आहेत आहातज्ज्ञ डॉ.शुभदा कळणावत – लोणीकर –
हिरवी सालाची मुगाची डाळ जाडसर दळून घ्यायची. त्यात धन्याचं पावडर, जिऱ्याचं पावडर, कढिपत्ता, कोथिंबीर, हे सगळं बारिक चिरून त्यात घालायचं. हवं त्या प्रमाणात मीठ आणि लहान मुलांना देत असाल तर कमी तिखट नाहीतर आवडीप्रमाणे तिखट टाकून ह्याचं पातळसर पीठ भिजवून घ्यायचं. जे मुलं आवडीनी खात नाहीत पण आवश्यक आहेत अशा भाजाही किसून टाकून शकता. आणि ह्याचे धिरडे तुम्ही मुलांना खायला घालू शकता. मुगाच्या डाळीत प्रोटीन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, कॉपर, झिंक आणि ईतर व्हिटॅमिन्स असतात आणि याच्या सेवनाने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता आपल्याला भरून काढता येते.
****
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्यात कोणतीही नोकरभरती होऊ दिली जाणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी दिला आहे. ते काल सांगली इथं पत्रकारांशी बोलत होते. आरक्षण प्रश्न सुटेपर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढवत ठेवली जाईल असं पाटील सांगितलं. या मागणीसाठी सांगली इथं काल धरणे आंदोलनही करण्यात आलं.
****
धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात काल अनेक ठिकाणी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसंच वैजापूर तालुक्यात महालगांव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आलं. लातूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर जालना शहरात गांधी चमन चौकात आंदोलन करण्यात आलं.
****
कृषी सुधारणा विधेयकांच्या विरोधात जालना जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर फळ पीक विम्याची रक्कम जमा करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
परभणी शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी या विधेयकांची होळी करुन निषेध नोंदवला. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं काल पाथरीच्या तहसीलदारांना निवेदन देत कृषी विधेयकांसह ४४ कामगार कायदे रद्द करावे अशी मागणी या केली. परभणी शहरातही तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं.
****
मराठवाड्यात अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. औरंगाबाद जिल्हयात पैठण, दौलताबादसह औरंगाबाद शहरातही काल जोरदार पाऊस झाला. परभणी शहर आणि परिसरात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी ९८ टक्क्यांवर पोहोचली असून, धरणातून ७५ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणाचा पाणीसाठा पन्नास टक्क्यांवर पोहोचला आहे.
****
औरंगाबाद महापालिकेनं शहरात विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींकडून गेल्या पाच महिन्यात २३ लाख ९२ हजार रुपये दंड वसूल केला आहे. घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली आहे. रस्त्यावर थुंकणे, रस्त्यावर कचरा टाकणे या साठी ही दंड ठोठावत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातल्या वाई ग्रामपंचायत कार्यालयातले ग्रामविकास अधिकारी शंकर गुंडमवार याला लाच घेताना काल अटक करण्यात आली. सार्वजनिक वाचनालय सुरु करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याकरता त्यानं दहा हजार रुपयांची मागणी केली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी सं��ाद साधणार आहेत. हा या मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला सोळावा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल.
****
0 notes