#��्रिकेट बातम्या
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जून २०१९ सकाळी ७.१० मि.
****
* सर्वसमावेशक, सुरक्षित आणि विकसनशील भारत निर्माण करण्याच्या दिशेनं सरकारची वाटचाल - राष्ट्रपतींचं प्रतिपादन
* केळकर समितीच्या अहवालातल्या शिफारशी आहेत तशा स्वीकारणं शक्य नसल्याचं, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट
* पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षण विधेयक, विधान सभेत एकमतानं मंजूर
* नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल
आणि
* पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वत्र योगाभ्यास शिबिरांचं आयोजन
****
सर्वसमावेशक, सुरक्षित आणि विकसनशील भारत निर्माण करण्याच्या दिशेनं सरकार वाटचाल करत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ते काल संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करत होते. महिलांना समान अधिकार देण्यासाठी तिहेरी तलाक आणि हलाला सारख्या कुप्रथांचं निर्मुलन करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. सरकारच्या विविध योजनांचा राष्ट्रपतींनी आढावा घेतला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाची प्रत पटलावर ठेवल्यानंतर लोकसभेचं काम काल दिवसभरासाठी स्थगित झालं, लोकसभेत आज मुस्लीम महिला विवाह संरक्षण विधेयक सादर होण्याची शक्यता आहे.
राज्यसभेतल्या तेलगु देशम पक्षाच्या चार खासदारांनी काल भाजपात प्रवेश केला. काल त्यांनी राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन, राज्यसभेतला आपला गट भाजपात विलीन करण्याचा प्रस्ताव दिला.
****
राज्याचा समन्यायी विकास व्हावा या उद्देशानं आघाडी सरकारनं नेमलेल्या डॉ. विजय केळकर समितीच्या अहवालातल्या शिफारशी आहेत तशा स्वीकारणं शक्य नसल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट केलं. विधान परिषदेत, काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. केळकर समितीच्या अहवालात, विभागाऐवजी तालुका घटक मानून शिफारसी करण्यात आल्या आहेत, या शिफारसी स्वीकार��्या तर, मराठवाडा आणि विदर्भावर अन्याय होईल, यामुळेच अहवालातल्या अनेक मुद्यांवर विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक आमदारांचा आक्षेप असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यात सर्व अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय अनिवार्य करणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करून, कायदा अधिक कडक केला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
इयत्ता दुसरीच्या गणित विषयात संख्यावाचनात केलेल्या बदलाचा मुद्दा विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केला होता. या पद्धतीमुळे गणित सोपं झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला, मात्र विधिमंडळाची मागणी असेल, तर या संदर्भात तज्ज्ञांची समिती नेमून, या समितीच्या शिफारसींनुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
****
दरम्यान, काल विधानसभेचं कामकाज सुरू होताच, मराठवाड्यातल्या पाणीपुरठ्याच्या मुद्यावरुन वादळी चर्चा झाली. मराठवाड्यातल्या जलसाठ्यांमध्ये सध्या फक्त एक टक्का पाणी शिल्लक असून, ते जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार फक्त पिण्यासाठी वितरित करण्यात येत असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. मात्र विरोधी पक्षांनी या मुद्यावरून सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी झालेल्या गोंधळामुळे उपाध्यक्षांनी विधानसभेचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केलं.
जिल्हा परिषदेच्या शाळाखोल्या दुरुस्तीसाठीचा वेगवेगळा निधी एकत्र करुन, त्याद्वारे शाळा खोल्या दुरुस्तीचा प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येणार असल्याची, माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान सभेत दिली.
****
तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातले अनेक मौल्यवान दागदागिने, भाविकांनी अर्पण केलेल्या वस्तू आणि पुरातन नाणी यांचा काळाबाजार आणि गैरव्यवहार झाल्या प्रकरणाची राज्य गुप्तवार्ता विभागामार्फ चौकशी केली जाणार आहे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली.
****
नदीपात्रातून वाळू उपशासाठी खनिकर्म महामंडळाला सर्वाधिकार देण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधान परिषदेत केली. आमदार विनायक मेटे यांनी जालना आणि बीड मधल्या वाळू तस्करांविरोधात कारवाई करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना मांडली होती.
****
राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आयटीआयची प्रवेश क्षमता पन्नास हजारानं वाढवणार असल्याचं काल विधान परिषदेत सांगण्यात आलं. कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी ही माहिती दिली.
****
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण लागू करण्याचं विधेयक, विधान सभेत काल एकमतानं मंजूर करण्यात आलं. मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण लागू केल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांनी, या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयानंही या संदर्भात राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात निकाल दिला होता. राज्यशासनानं त्यानंतर अध्यादेश काढून वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू केलं होतं. या अध्यादेशाचं विधेयक काल विधानसभेनं मंजूर केलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
नैऋत्य मोसमी पाऊस काल राज्यात दाखल झाला. मोसमी पावसानं सिंधुदूर्ग, रत्नागिरीसह कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग व्यापल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मोसमी पाऊस राज्यभर सक्रीय होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. काल तळकोकणाच्या काही भागात मोसमी पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे. हिंगोली जिल्ह्यात गोरेगांव परिसरात पूर्वमोसमी पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन आज साजरा होत आहे. या निमित्तानं सर्वत्र सामुहिक योगाभ्यासाचं आयोज��� करण्यात आलं आहे. झारखंडची राजधानी रांची इथं आयोजित योगाभ्यास शिबीरात, पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत. योगदिनाचा राज्यातला मुख्य कार्यक्रम नांदेड इथं होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत योगगुरु बाबा रामदेव या ठिकाणी उपस्थितांकडून योगाभ्यास करून घेत आहेत.
योग दिनाच्या अनुषंगानं औरंगाबाद शहरात काल सकाळी माहिती आणि प्रसारण मंत्रालय, योगसंवर्धन संस्था आणि शासकीय क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमानं योग दिंडी काढण्यात आली. हिंगोली आणि बुलडाण्यासह राज्यात विविध ठिकाणी काढलेल्या योग दिंडीत योग प्रसार संस्थांसह, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. औरंगाबादसह मराठवाड्यात सर्वत्र, विविध उद्यानं तसंच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आज योगाभ्यास केला जात आहे.
दरम्यान, योग प्रसारासाठी दिले जाणारे यंदाचे पंतप्रधान पुरस्कार काल जाहीर झाले. गुजरातमधली स्वामी राजर्षी मुनी लाईफ मिशन, बिहारच्या मुंगेर इथली स्कूल ऑफ योग, जपानमधलं योग निकेतन आणि इटलीच्या अँटोनिएटा रोझी यांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पंचवीस लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
क्रिकेट -
विश्वचषक़ क्रिकेट स्पर्धेत काल ऑस्ट्रेलियानं बांगलादेशचा ४८ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३८२ धावांचा पाठलाग करताना, बांगलादेश संघ आठ गडी गमावून ३३३ धावा कर��� शकला. या विजयामुळे गुणतालिकेत दहा गुणांसह ऑस्ट्रेलिया पुन्हा सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. आज या स्पर्धेत इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात लढत होणार आहे.
****
बेरोजगारीच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं. शासकीय विभागातल्या रिक्त जागा तत्काळ भराव्यात, सुशिक्षित बेरोजगारांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा याप्रमुख मागण्यांचं निवेदन यावेळी विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलं.
****
लातूर इथं काल एका फरार गुन्हेगाराला अटक करण्यासाठी लग्नमंडपात दाखल पोलिसांवर वऱ्हाडी मंडळींनी हल्ला चढवला. सख्ख्या भावाच्या लग्नात आलेल्या फरार गुन्हेगाराला पकडण्यासाठी हे पोलिस आले होते. या हल्ल्यात चार पोलीस जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उस्मानाबाद शहरातल्या प्रभाग क्रमांक सहामधल्या नागरिकांना टँकरद्वारे दररोज दोन वेळा पाणी पुरवठा केला जाणार आहे. बांधकाम सभापती नगरसेवक शिवाजी गवळी यांनी ही माहिती दिली.
****
फाईट फॉर जस्टिसच्या वतीनं काल औरंगाबाद इथं, आरक्षणाच्या अत्यधिक प्रमाणाच्या विरोधात मूक मोर्चा काढण्यात आला. पदव्यूत्तर आरक्षण पूर्णपणे बंद करावं, अभ्यासक्रमांना आर्थिक निकषांवर प्रवेश मिळावेत, अशा आणि इतर मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या एकोड - पाचोडचा ग्रामसेवक दीपक क्षीरसागर याला राहत्या घरी सात हजार रूपयांची लाच घेतांना काल लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं पकडलं. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधलेल्या शौचालयाच्या अनुदानाचा धनादेश देण्यासाठी त्यानं लाच मागितली होती.
****
सातारा जिल्ह्यात कोयनानगर इथं काल सकाळी भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे चार पूर्णांक आठ आणि तीन रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनेपासून ३२ किलोमीटर अंतरावर देवरुख या गावी असून यात कोणतीही हानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
//*************//
0 notes