#संजय मांजरेकर दिग्दर्शक
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 January 2018 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक  १९ जानेवारी २०१८ सकाळी ६.५० मि. ****
• २९ वस्तू आणि ५३ श्रेणीतल्या सेवांवरच्या करात कपात करण्याचा वस्तू आणि सेवा कर परिषदेचा निर्णय • नदीत वाहून जाणाऱ्या दोन महिलांचे प्राण वाचवणाऱ्या नांदेडच्या नदाफ इजाज अब्दुल रौफला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार • औरंगाबाद इथं आजपासून अखिल भारतीय वैदिक संमेलन आणि • पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास प्रारंभ **** वस्तू आणि सेवा कर परिषदेनं २९ वस्तू आणि ५३ श्रेणीतल्या सेवांचे कर कमी केले आहेत. काल नवी दिल्ली इथं झालेल्या परिषदेच्या बैठकीत हे कर कमी करण्यात आल्याची माहिती, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वार्ताहरांना दिली. हे नवीन कर येत्या २५ तारखेपासून अंमलात येतील. तीन प्रकारच्या वस्तू आणि सेवा करांना एकत्रित करुन कर परतावा प्रक्रिया सोपी करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचं जेटली यांनी सांगितलं. ५०० रुपयांपर्यंतचं नाटकाचं तिकीट, गणेशमूर्ती यांना जीएसटीमधून वगळण्यात आलं आहे. हिरे, जुन्या चारचाकी, खाजगी कंपन्यांचा एल पी जी गॅस, टेलरिंग व्यवसाय, वॉटर पार्क, थीम पार्क सारख्या सेवांचाही यात समावेश असून या वस्तूंवरचा कर कमी करण्यात आला आहे. बांधकाम क्षेत्र, पेट्रोल आणि डिझेल वर जीएसटी लागू करण्याबाबत या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलं. **** ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार २०१७’ साठी देशभरातून १८ मुलांची निवड झाली आहे. यात सात मुली असून, तीन मुलांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार दिले जाणार आहेत. नांदेडच्या नदाफ इजाज अब्दुल रौफ याचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नदीत वाहून जाणाऱ्या चार महिलांपैकी दोन महिलांना नदाफनं वाचवलं होतं. येत्या २४ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. **** जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात शहीद झालेला धुळ्याचा जवान योगेश भदाणे यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारच्या वतीनं एक कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी ही माहिती दिली. भामरे यांनी काल भदाणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शहीद जवानाच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. **** ��ंजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या चित्रपटावर बंदी घालण्याच्या गुजरात आणि राजस्थान सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत या राज्य सरकारांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशावरुन आता पद्मावत हा सिनेमा संपूर्ण देशभरात येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तसंच इतर कुठल्याही राज्याला अशी बंदी घालता येणार नाही, असंही न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. **** देशात २१८ होमिओपॅथी महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी या वैद्यकीय पध्दतीचं शिक्षण घेत असून त्या माध्यमातून चांगले डॉक्टर्स घडतील असा विश्वास केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबादनजीक पडेगाव इथं सायली चॉरिटेबल ट्रस्टच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी नाईक काल बोलत होते. प्राचीन काळापासून सुरक्षित चिकित्सापद्धती म्हणून होमोओपॅथीला पुढे नेण्यासाठी केंद्राच्या आयुष मंत्रालयामार्फत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असल्याचं नाईक यांनी यावेळी सांगितलं. **** समाजातल्या आर्थिक असमानतेचं प्रतिबिंब हे विद्यापीठांमधल्या उच्च शिक्षणांमध्ये दिसत असल्याचं परखड मत रॅमेन मॅगसेस पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी व्यक्त केलं. ते काल औरंगाबाद इथं स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या दुसऱ्या राज्यस्तरीय विद्यापीठ विद्यार्थी संमेलनात बोलत होते. एकीकडे उद्योजकांचा आकडा वाढतो आहे. मात्र शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कोणतीही वाढ होतांना दिसत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** औरंगाबाद इथं आज अखिल भारतीय वैदिक संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या तीन दिवसीय संमेलनात विविध व्याख्यानं, परिसंवादांचं आयोजन करण्यात आल्याचं संमेलनाध्यक्ष अनिल भालेराव आणि संयोजक दुर्गादास मुळे यांनी कळवलं आहे. **** बीड जिल्ह्यातल्या पिंपरखेड इथं २०१६ मध्ये बाळासाहेब चव्हाण या व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सावकारी करणाऱ्या चव्हाण यांच्याकडून आरोपींनी व्याजानं पैसे घेतले होते,त्यावरुन ��ालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली होती. **** पाचव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं काल चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. उद्घाटनानंतर अतनू मुखर्जी दिग्दर्शित ’रुख’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. चार दिवस चालणाऱ्या महोत्सवात जगभरातल्या विविध भाषांमधले ३० सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा या तालुक्यांमधल्या काही गावात तर लातूर जिल्ह्यातल्या आशिव आणि उजनी परिसरात काल मोठा गुढ आवाज होऊन जमीन हादरली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या या आवाजामुळे अनेक घरांच्या खिडक्या तसंच दरवाजांची तावदानं हादरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सरकारविरूद्ध काढलेली हल्लाबोल यात्रा काल बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई, माजलगाव आणि गेवराई इथं गेली. या ठिकाणी झालेल्या सभांमधून पक्षाचे नेते अजित पवार, विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि अन्य नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. **** अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई इथल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातल्या आरोपींना नाशिक सत्र न्यायालय येत्या २० तारखेला शिक्षा सुनावणार आहे. न्यायालयानं सहा आरोपींना दोषी ठरवलं असून एकाची निर्दोष मुक्तता केली आहे. शिक्षे संदर्भातल्या युक्तिवादाच्यावेळी सरकारी वकील उज्वल निकम यांनी दोषींना देह दंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. आंतरजातीय प्रेमप्रकरणातून जानेवारी २०१३ मध्ये सोनईजवळ गणेशवाडी शिवारात विठ्ठलवाडी इथं तीन तरुणांची हत्या करण्यात आली होती. **** २८ जानेवारी आणि ११ मार्च या दिवशी देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असून, या मोहिमेत जालना जिल्ह्यातला शून्य ते पाच वयोगटातला एकही बालक वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले आहेत. जालना इथं पल्स पोलिओ समन्वय समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते. **** औरंगाबाद इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल दोन दिवसीय ‘डॉ.मोईन शकीर व्याख्यानमाले’ला सुरुवात झाली. या व्याख्यानमालेत काल ‘भारतीय राज्यसंस्था आणि चळवळींचा संबंध’ या विषयावर शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रकाश पवार यांचं व्याख्यान झालं. सर्व चळवळी या राज्यसंस्थांसाठी मार्गदर्शक होत्या, मात्र सद्यस्थितीत चळवळींचा दबाव राज्यसंस्थांवर नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. आज या व्याख्यानमालेत ‘भारतीय राज्यसंस्था आणि तंत्रविज्ञानाचे संबंध’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. **** बार्शी इथल्या सरोदवादक प्रा. अबोली सुलाखे यांना आज मुंबई इथं वनिता समाजच्या वतीनं दिला जाणारा ‘कला गौरव पुरस्कार’ डॉक्टर श्रृती सडोलीकर काटकर यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि २५ हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. //**********//
0 notes