omkarbhoir
Omkar B
3 posts
Writer by the night
Don't wanna be here? Send us removal request.
omkarbhoir · 5 years ago
Photo
Tumblr media
Grey
0 notes
omkarbhoir · 5 years ago
Photo
Tumblr media
ओहोटी
0 notes
omkarbhoir · 5 years ago
Text
डोंगर, देवदार आणि दगड
प्रस्तावना 
हिमालयात फिरायला गेलेला तसा मी काही पहिला मनुष्य नाही. अगदी अभ्यासपूर्ण, जिज्ञासू आणि संशोधक मन असलेला आणि हिमालयाचं रहस्य आता मीच सोडवणार असा विचार करणारा तर मुळीच नाही. कामाच्या रह��टगाड्यात कंटाळलेलो आम्ही तिघे जण काहीतरी वेगळं म्हणून कामधंदे सोडून फिरायला गेलो तेवढंच काहीसं ऍडव्हेंचर. तिघांचे तीन वेगळे विचार, कामं करण्याच्या वेगळ्या पद्धती आणि समोर दिसतंय ते चितारण्याच्या वेगळ्या शैली. हे जे तुम्ही आता काही वाचताय, पाहताय हि माझी शैली.
हे प्रवास वर्णन नाही, अनुभवकथन नाही, हा काही प्रवासाचा इतिवृत्तांत सुद्धा नाही, तर मला गोळा कराव्याशा आणि सांगाव्याशा वाटलेल्या क्षणाचा घेतलेला मागोवा आहे. हे काही पॅचेस आहेत; आठवणीत सदैव कोरल्या गेलेल्या क्षणांचे. बरं, या फक्त आठवणी नाहीयेत तर त्यासोबत काही पुरावे सुद्धा आहेत, त्या क्षणांचे. पहिला पुरावा म्हणजे, गोळा केलेले काही दगड; जे निःशब्द, शाश्वत असतात. त्यांना भावना नसतात पण त्यांनी सगळं सोसलेलं असतं, अनुभवलेलं असतं. दुसरा पुरावा म्हणजे  झाडांची पानं आणि लाकडाचे काही तुकडे, झाडं तशी दगडांइतकी जुनी नसतात. पण ती नव्याने येत असतात, बहरत असतात. त्या झाडांच्या आधीच्या पिढ्यांनी, दगडांसारखंच सगळं पाहिलेलं असतं, आळीपाळीनं. त्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या जोरावर ती तग धरून उभी असतात.
असेच काहीसे क्षण, काही पुरावे सांगणारे हे शब्द. बस्स, त्यापलीकडे काही नाही.
...........
९ ऑगस्ट, २०१८. गुलमर्ग, काश्मीर.
Tumblr media
“इरफानभाई, अब ये टुरिस्ट स्पॉट बोहोत हो गये. किधर ऐसी जगह ले चलो, जहाँ कोई नहीं हो.”
आमचे घोडे रस्ता सोडून कच्च्या वाटेला लागले. घोडा आणि इरफान सराईतपणे त्या गोल दगडांवरून आणि गुडघाभर चिखलातून जात होते. आम्ही पाठीवर बॅगा आणि मुठीत जीव घेऊन कसेबसे त्या चार पायांच्या फुरफुरणाऱ्या प्राण्यावर बसलो होतो. हलकासा पाऊस पडत होता म्हणून इरफानची थोडी घाई चालली होती. त्या अरुंद पायवाटेवरून जाताना आजूबाजूच्या झुडूपाला आमचे पाय घासले जात होते. इथे आम्हाला माणसं दिसत नव्हती. उगाच खिदळणं नाही, मोबाईलवर फोटो काढणं नाही. जसजसे पुढे जात होतो, वाहत्या पाण्याचा आवाज तीव्र होत होता. इरफानला आम्हाला काय हवंय ते कळलं होतं.
एक ओहोळ होता तो. मोठमोठाले दगड असलेला, आधी भिजून गेलेल्या दगडांवर चांगलंच शेवाळ साचलं होतं. आजूबाजूला सरळ वाढलेली पाईन ची घनदाट झाडं आणि त्यातूनही झिरपून पडणारा पाऊस. ओलं करणारा नव्हे तर जॅकेटवर दवबिंदूंसारखा विसावणारा. या सगळ्याला खळाळत वाहणाऱ्या पाण्याचं पार्श्वसंगीत. पाणी मात्र स्वच्छ होतं. इरफान गेला आणि ओंजळीत पाणी घेऊन प्यायला. आम्हालाही बोलला, “पीओ, कुछ नहीं होता हैं” आम्ही सुद्धा एका रिकाम्या बाटलीत पाणी भरून घेतलं आणि घोटभर प्यायलो.
मग आम्ही तिथे विसावलो, बराच वेळ थांबलो. दगडांवर बसलो, ओल्या गवतातून फिरलो. निघालो तेव्हा दुपार टळून गेली होती. भूक जाणवायला लागली होती पण आम्हाला त्या दिवशीचा निवांत क्षण मिळाला होता.
...........
१० ऑगस्ट, २०१८. श्रीनगर, काश्मीर.
आठवणीत ठेवण्यासारख्या क्षणातला हा एक क्षण. लिहिताना पेनाची खरखर स्पष्ट ऐकू यावी, इतका निवांत आणि शांत. काय असेल या शांततेचं रहस्य? मला उगाचंच पहिल्या जगातून आलेल्या त्या पत्रकारांच्या भूमिकेत घुसायचं नाहीये. पण देवदारच्या लाकडांनी नटलेल्या या हाऊसबोट मधली हि उबदार शांतता; माझ्या मनातल्या ‘काश्मीर’ या समीकरणाबाबत अजूनच गोंधळ उडवत आहे. हि वरवरची शांतता की हाच या लोकांचा खरा पिंड? जादूच्या दुनियेत जसं काहीतरी एका क्षणी असतं, तेच दुसऱ्या क्षणी नसतं तसं तर हे फसवं जग नाही ना?
“काश्मीर का मौसम मुंबई के फॅशन कि तरह होता है; कब बदल जाये पता नहीं चलता. समझे?” आमचा ड्रायव्हर जावेद आम्हाला सांगत होता, ते कदाचित या अर्थीही लागू पडत असावं.
Tumblr media
श्रीनगर वरून आम्ही निघालो होतो जाताजाता जावेद गाडीच्या समोरच्या काचेतून मान किंचित खाली वाकवत काहीतरी पाहत बोलला,  ** **
“ये जो सामने देख रहे हो ना? ये बड़ा वाला पेड़; इसे चिनारका पेड़ बोलते है.”
“जो ‘मोहब्बतें’ मूवी मै पत्ते उड़ते है ना? वो इसी पेड़ के होते है.”
“ये पेड़ काटने को अभी गवर्नमेंट का बैन है. सजा होती है; हाँ.”
मला त्या झाडाची पानं हवी होती. सुदैवाने मिळाली.
...........
१० ऑगस्ट, २०१८. झोजिला पास, काश्मीर.
Tumblr media
एव्हाना निसर्गातली स्थित्यंतरं स्पष्ट जाणवायला लागली होती. पर्वतांचे आकार वाढत चालले होते आणि त्यांच्यावरची झाडं आता कमी होत होती. ठिसूळ दगडांचे अजस्त्र पर्वत, त्यांच्यावर नजर फिरवताना छाती दडपून जाईल एवढे भव्य. अशाच एका मोठ्या पर्वताच्या पायथ्याशी आम्ही चहासाठी थांबलेलो होतो. एरवी घाई करणारा जावेद सुद्धा निवांत होता. चहा येईपर्यंत ��म्ही डोंगराच्या मंद चढाव���वर जायचा प्रयत्न केला. वर एक मेंढपाळ आपल्या बकऱ्यामेंढ्या घेऊन जवळजवळ बर्फापर्यंत गेला होता. चित्रविचित्र आकाराचे असंख्य दगड होते, दगडांमध्ये कोणता तरी धातू नक्की असावा त्याशिवाय ते चमकत नसावेत. बराच वेळ थांबल्यानंतर जावेदची हाक आलीच. आम्ही पुढे निघालो.
...........
१० ऑगस्ट, २०१८. कारगिल युद्ध स्मारक, द्रास, काश्मीर.
Tumblr media
युद्धस्य कथा: रम्या:
कुठे बनतात अशी माणसं? बलिदान, शहीद होणं ऐकायला किती छान वाटतं पण वेळ आलीच तर आम्ही काय करु? कसे वागू? आम्हाला खरंच किंमत कळते या त्यागाची कि त्यांनासुद्धा त्याचा पगार मिळतो, बऱ्याचश्या सवलती मिळतात असं म्हणून फक्त सोडून देतो आपण? झेंड्यासाठी जीव देणाऱ्या या सैनिकांना काय वाटत असेल जेव्हा ते सुटीवर घरी येतात आणि गलिच्छ राजकारणाने बरबटलेली वर्तमानपत्रं पाहतात? “हिटलर सारखा देश चालवला पाहिजे” असं जेव्हा नाक्यावरचे  विद्वान एकमेकांना म्हणतात तेव्हा काय वाटत असेल त्या महापुरुषांना ज्यांनी रक्त आटवलंय आणि सांडलंय या लोकशाहीसाठी?
द्रास च्या त्या कारगील युद्ध स्मारकातून बाहेर पडताना, कमानीवर एक ओळ लिहिली होती.
‘When you go home, tell them of us and say, ‘For their tomorrow, we gave our today.’
'जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा जाऊन सांगा, तुमच्या भविष्यासाठी आम्ही आमचा वर्तमान दिलाय.'
आजूबाजूच्या हिमालयाइतकाच उत्तुंग पराक्रमाची आठवण म्हणून एक त्रिकोणी दगड मी चालता चालता उचलला. ‘टायगर हिल’
...........
११ ऑगस्ट, २०१८. लेह-लडाख.
डोंगरांचे आकार एव्हाना पूर्णतः बदलले होते. त्यात तळहातावर मावतील अश्या आकाराच्या अब्जावधी दगडांनी बनलेले पर्वत होते. तर काही पर्वत वाळूचे मोठमोठाले ढिगारे वाटावेत तसे दिसत होते. काही पर्वतांच्या शिखरांवर बर्फ अजूनही होता तर काहींचा पूर्ण वितळलेला होता. दर दोन डोंगरांपलीकडून एखाद्या कपारीतून पाण्याचा प्रवाह झिरपत होता. शांत. संथ. खाली वाहणाऱ्या नदीला तो जाऊन मिळत होता. तिला दोन पावलं पुढे घेऊन जात होता.
बऱ्याच तासांच्या प्रवासानंतर लेह आलं. गाडीतून उतरलं कि जड झालेले श्वास जाणवत होते. अगदी रस्ता ओलांडताना सुद्धा थकायला होत होतं. राज्य बदललेलं नव्हतं पण माणसं, भाषा, धर्म आणि आजूबाजूचं वातावरण चांगलंच बदललेलं होतं. काहीही न करता आलेला थकवा जाणार नव्हताच किंबहुना काही केलं तर वाढणारच होता. फार विचार न करता आम्ही सरळ झोपी गेलो.
...........
११ ऑगस्ट, २०१८. फोर्ट रोड, लेह.
“च्यायला, हा कसला ड्राय डे? आपल्याकडे ड्रायडे ला ड्रिंक्स नाही मिळत. आणि इथे..”
“ड्रिंक्सचं सोड रे, नॉन वेज बंद नको असायला हवं होतं”
“हो ना यार, चिकन मोमो तरी ऍटलीस्ट”
“….”
“बरं, खायला काहीतरी साधंसं घेऊयात, मला ते तिबेटियन फ्लॅट नूडल्स नाही जमले फारसे.”
“हं”
“लोकं बाकी छान आहेत लडाखची; आपल्याला आवडली. उगाच काही कटकट नाही. लोकांना फसवणं नाहीं. निमूटपणे आपापलं काम करतात. विचारलं तेवढंच बोलतात. टुरिझम वाढलंय, एवढी लोकं येतायत पण नीट बोलतात; उद्धटपणा नाही, तुमच्या पुण्यासारख्या”
“आवडली ना? छान. घरी घेऊन जा मग त्यांना”
...........
१३ ऑगस्ट, २०१८. श्योक नदी पात्र, नुब्रा.
Tumblr media
“क��ती वर्षं लागत असतील नाही य�� दगडांचे वाटोळ्या आकाराचे गोटे व्हायला? कित्येक वर्ष बर्फाखाली, पाण्याखाली रगडून निघत असतील. काय काय घरंगळत जात असेल यांच्यावरून. बर्फ, पाणी आणि अजून खूप सारी मोठी दगडं सुद्धा.
दगडं पण बघ ना, वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या टेक्शचरची. हा प्रवाहच बघ किती मोठा आहे; ज्याच्या मधोमध आपण उभे आहोत. कितीतरी वर्ष लागली असतील फक्त हा प्रवाह बनायला आणि मग या दगडांचे गोटे.
बरं, आता या गोट्यांचं काय होणार पुढे? हे असेच राहतील कि झिजून झिजून छोटे होत होत वाळू बनून जातील?”
“...”
“आपण खूप लहान आहोत रे या सगळ्यांपुढे, खूप लहान”
...........
१४ ऑगस्ट, २०१८. पॅंगाँग तलाव.
भलाथोरला तलाव, भोवती शिखरावर बर्फ असणारे पर्वत. जोरजोरात वाहणारा अतिथंड वारा. त्यात पडणारा पाऊस. तो पाऊस अक्षरश: झोंबत होता. तलावात कमीतकमी पाय ओले करावेत असं वाटत होतं. पण थंडीत बूट काढायची हिंमत होत नव्हती. तरीही पाण्यात हात बुडवून पहिलाच. पाणी बर्फाइतकं थंड होतं. हात चोळतच आम्ही गाडीत येऊन बसलो. तेव्हा कुठे बरं वाटलं.
थोडं पुढे गेल्यावर एका ठिकाणी अजून बरेचसे पर्यटक होते, काही छोट्या टपऱ्या होत्या, तिथे गेलो. गेल्यावर कळलं आजूबाजूला फार मराठी लोकं आहेत. कोण कोणाला फोटो काढायला सांगतंय,कोण हाका मारतंय. क्षणभर आपण महाबळेश्वरला आलोय असं वाटलं.
...........
१५ ऑगस्ट, २०१८. चांगला पास.
आयुष्यात आज पहिल्यांदा स्नोफॉल पहिला. आजूबाजूला साचलेला बर्फ उचलून त्याचा हाताने गोळा करताना हात थंड पडले पण मज्जा आली. पटकन आरोहीची आठवण झाली. आरोही म्हणजे माझी भाची. ‘काश्मीरला येताना कालाखट्टा ची एक बाटली घेऊन यायची आणि तिथे हवे तेवढे बर्फाचे गोळे बनवुन खायचे’ हे तिचं खूप जुनं स्वप्न. मनातल्यामनात हसतच मी तिथल्या त्या झोपडीवजा हॉटेलात गेलो. बऱ्यापैकी गर्दी होती आत. बाहेरच्या थंडीमुळे आतली उब हवीहवीशी वाटत होती. आत चहा झाला नसता तरच नवल.
चहाचे पैसे देऊन आम्ही बाहेर पडलो. जॅकेट वर जमा झालेले बर्फाचे छोटे छोटे कण झटकून गाडीत बसलो. आणि परत रस्त्याला लागलो.
अजून काही तासांनी आम्ही लेहला पोहोचणार होतो. मग तिथून उद्या पहाटेच पुढल्या ठिकाणी निघणार होतो. नेक्स्ट डेस्टिनेशन. मनाली.
...........
१६ ऑगस्ट, २०१८. लेह आणि ��नालीच्या मध्ये कुठेतरी.
भलताच वळणदार रस्ता आहे. ठिकठिकाणी दरड कोसळली आहे; ती हटवण्याचं काम चाललंय. हिमाचल प्रदेश टुरिझम ची ती बस, हळूहळू घाटातून पुढे चाललीये. हा प्रवास खूप थकवणारा आहे. बसच्या खिडकीतून खाली पाहिलं कि दरीच्या एकदम टोकावरून जाणारी बस ची चाकं दिसतायत. म्हणून खिडकी बाहेर पहायची तशी हिंमत होत नव्हती. आम्ही बसल्या बसल्या झोपा काढत होतो.
......
“टोंटी मिनिट ब्रेक फॉर टी, ओन्ली टोंटी मिनिट” बसचा क्लिनर ओरडून सांगत होता (बस मधल्या फिरंगींसाठी इंग्रजी).
बस मधली माणसं उतरत होती चहा पिऊन येऊन गाडीत परत झोपत होती. थोड्या थोड्या अंतराने चहासाठी थांबणं चालूच होतं. कदाचित, प्रवाशांपेक्षा ड्रायव्हरला त्याची जास्त गरज होती.
......
“कंटाळा आला राव आता, किती वेळ झाला च्यायला तोच डोंगर दिसतोय. हा डोंगराभोवती गोल गोल बस फिरवतोय कि काय?”
“.....”
“ए, उठ ए. किती झोपणार आहेस”
Tumblr media
१७ ऑगस्ट, २०१८. मनाली.
दुसऱ्या दिवशी दुपारी, साधारण तीन वाजता मनाली आलं. जांभया देत हळूहळू सगळेजण बसमधून खाली उतरले.
...........
१९ ऑगस्ट, २०१८. मनाली.
मनाली खरंच सुंदर आहे. गेल्या दहा बारा दिवसापासून भटकणारे आम्ही इथे जरा विसावलोय. उशिरा उठतोय, हॉटेल मध्ये बॅग्स ठेऊन इकडे तिकडे भटकतोय. इथल्या शेजारच्याच, मॅक्स नावाच्या एका राजबिंड्या कुत्र्याशी चांगलीच मैत्री झालीये. तो रात्रीच्या जेवणाच्या वेळेस आमच्या सोबतच असतो. मनालीत येऊन खूप दिवसांनी बटर चिकन खाल्लं. खूप बरं वाटलं. अधूनमधून घरची आठवण सुद्धा येतेय, खासकरून जेवताना. घरी गेल्यावर पहिल्यांदा मासे खायचे हे आम्ही तिघांनी नक्की ��ेलं.
सगळ्याबाजूनी डोंगरांनी वेढलेलं मनाली शहर आपल्याच मस्तीत जगतंय. वज्रेश्वरीला, आमच्या गावी, अबोलीची पुष्कळ झाड आहेत, मागच्या अंगणात. तशीच इथल्या  अंगणात गुलाबाची झाड आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर बरीच फुलं सुद्धा आहेत. सिनेमा मध्ये पाहिलेल्या, पाठीवर सफरचंदाच्या टोपल्या घेऊन फिरणाऱ्या सुंदर बायका इथे खरंच दिसतायत. इतक्या सुंदर ठिकाणच्या मुली सुंदर नसत्या तरच नवल.
मनाली हे इतर कुठल्याही हिल स्टेशन सारखं आहे अस आम्हाला बरेच जण बोलले होते पण आमचा अनुभव वेगळा होता. कदाचित आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आलो नव्हतो म्हणून असेल. काहीही असो, मनाली मध्ये आम्ही रमलोय.
...........
२१ ऑगस्ट, २०१८. मनाली.
Tumblr media
मनालीतला तिसरा दिवस. आजूबाजूचं फिरून झालंय. घरच्यांसाठी काही छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्यात. पण इथल्या नेचर पार्कमधुन पाय निघत नाहीएत. नेचर पार्क असावं तर असं. कुंपण घातलेलं एक जंगलच. उंचच उंच वाढलेली देवदार ची झाडं. अधून मधून दिसणारी काही छोटी-मोठी दगडं, बऱ्याचश्या दगडांवर शेवाळ आलंय. पण या शेवाळावरून पाय घसरत नाहीत. उलट ते छान मऊमऊ आहे. या जंगलातून एक पायवाट गेलीये. जंगलाच्या डाव्या बाजूला मनाल्सु नदी वाहतेय. तिथल्या थंड शांततेत सारखी आपली आठवण करून देतेय. जमिनीवर देवदार वृक्षाची फळ पडली आहेत त्यांना देवदार वृक्षाचा विशिष्ठ असा सुरेख वास आहे. हा वास हॉटेलात, देवळात आणि बऱ्याच ठिकाणी येत होता, हाउसबोटीत सुद्धा. कारण इथे सगळीकडे देवदारचीच लाकडं वापरली होती.** **
पार्कात खूप निरनिराळ्या प्रकारची माणसं दिसत होती. बरेचसे पर्यटक होते, स्थानिक बायका त्यांच्या पारंपरिक वेशात काहीतरी शोधत होत्या. विचारल्यावर कळलं कि त्या मशरूम शोधत होत्या. गोल हिमाचल पद्धतीची टोपी घातलेले लोक जाताना दिसत होते. कॉलेज ला जाणारी काही जोडपी सुद्धा एकांत शोधत तिथे आली होती. तो एकांत त्यांना तिथे मिळत होता. प्रत्येकाला प्रत्येकाचा निवांत वेळ मिळावा एवढं मोठं पार्क होतं ते. मला सुद्धा मिळाला, पण पहिल्या दिवसाचा पुरला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो आणि तोही पुरला नाही म्हणून तिसऱ्या दिवशी सुद्धा गेलो. तिथे बसून मी पुस्तक वाचलं, डायरीत थोडंफार लिहिलं आणि चक्क एका मोठ्या दगडावर झोपलो सुद्धा.
तिथे ठेवलेले खुप पक्षी पाहिले. त्यातला सर्वात आवडला तो म्हणजे ‘चकोर पक्षी’. मी जेव्हा जेव्हा तिथे गेलो तेव्हा तेव्हा त्याला भेटून आलो. हाच पक्षी पाकिस्तानचा राष्ट्रीय पक्षी आहे हे नंतर कळलं.
शेवटच्या दिवशी गेलो तेव्हा तिथे एका भोजपुरी गाण्याचं शूटिंग सुरु होतं. लांब केस मोकळे सोडलेली एक सुंदर मुलगी फुलाफुलांच्या झोपाळ्यावर बसून झोके घेत होती. आजूबाजूला बरेच फिरंगी जमा झाले होते आणि गमतीनं शूट पाहत होते, फोटो काढत होते.
ती माझी शेवटची फेरी होती त्या पार्कातली, एवढ्या सुंदर ठिकाणाची दगडाव्यतिरिक्त काहीतरी आठवण मला हवी होती. मी देवदारच्या एका पडलेल्या अजस्त्र वृक्षाजवळ गेलो, त्या लाकडाचे काही तुकडे उचलले. मला परत त्या पार्कात जायचं होतं. ते तुकडे ओंजळीत घेऊन त्यांचा वास घेतला कि मी तिथे अलगद जाऊन पोहोचणार होतो. मी माझ्यासाठी ट्रिप वरुन आणलेली ती सर्वात मौल्यवान गोष्ट होती.
त्या पार्कने मला काय दिलं हे शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. हा आमच्या ट्रिप चा शेवट होता. आणि तो शेवट खरंच सुंदर झाला.
1 note · View note