Don't wanna be here? Send us removal request.
Text
वानप्रस्थ: अर्धविराम
प्रिय वाचकहो, नमस्कार!
लाडकी लेक जयश्री( i.e.जयू) हिचं बाळंतपण आटपून शुभदा आणि अनंत घरी परत येईपर्यंत आतां त्यांच्या गोतावळ्याशी आपली भेट होणं नाहीं! त्यामुळे या सुवर्णमहोत्सवी टप्प्यावर मी आज 'वानप्रस्थ ' ला अर्धविराम देत आहे!
अधुनमधून कांंही अपरिहार्य कारणास्तव पडलेले ६ खंड वगळतां जवळजवळ वर्ष���हून अधिक काळ मी दर गुरुवारी WhatsApp वर सादर केलेल्या या लेखमालेला आपुलकीचं पाठबळ दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ५०
अनंतच्या समजावण्यावर कुठलीही प्रतिक्रिया न देतां शुभदा डबडबलेल्या डोळ्यांनी नुसतीच त्याच्याकडे बघत राहिली! तिची ती विकल अवस्था पाहून अनंतलाही भरून आलं. तिच्या शेजारी बसून तिचे हात हलकेच हातांत घेत तो म्हणाला, "इतकी वर्षं ठरवून निभावलेला निर्णय जयू-योगेशने सहज मनांत आलं म्हणून बदलला असेल असं खरंच तुला वाटतं कां? कुठल्या परिस्थितीत, कां त्यांनी असं केलं असेल ते जाणून घेऊन आपण त्यांच्यामागे उभं रहायला हवं ना? मग त्यासाठी मी योगेशने पाठवलेली मेल बघूं कां?" शुभदाने मूकपणे मान हलवली तशी अनंत चट्कन उठला आणि त्याने लॅपटॉप चालूं केला. दोन मिनिटे लॅपटॉपशी झटापट केल्यावर त्याने शुभदाला विचारलं, " योगेशने भलीमोठी मेल पाठवली आहे;-- तूं पण येतेस कां ती वाचायला?" अपेक्षेप्रमाणे शुभदाने मानेनेच नकार दिल्यावर हायसं वाटून अनंत लॅपटॉपवर कांहीतरी लक्षपूर्वक वाचीत असल्याचा देखावा करीत असतांना त्याला मनोमन जयू आणि योगेशच्या मनकवडेपणाचं खुप कौतुक वाटत होतं! शुभदाची प्रतिक्रिया काय होईल याबद्दल त्या दोघांचा कयास किती अचूक ठरला होता! १०-१२ मिनिटांच्या अवधीनंतर खुंटा हलवून बळकट करण्यासाठी अनंतने पुन: विचारलं, " शुुभदा,तूं स्वत: वाचून बघणार आहेस कां मी सांगूं तुला योगेशने काय लिहिलं आहे?" "माझ्या अंगांत सगळं वाचून बघण्याचं त्राण नाहींये हो! तुम्हीच थोडक्यांत सांगा काय ते!" शुभदा थकलेल्या आवाजात म्हणाली. लॅपटॉप बंद करून अनंत शुभदापाशी येऊन बसला आणि म्हणाला, "योगेशने शेवटीं काय लिहिलं आहे ते आधी सांगतो! मगाशी बोलतांना जरी तो 'जयू स्वत: ही खुशखबर सांगायला लाजते आहे असं म्हणाला असला तरी प्रत्यक्षांत ती तुला सांगायला घाबरत होती' असं त्याचं म्हणणं आहे!" ते ऐकून त्याही परिस्थितीत शुभदाला हंसू आलं आणि ती उद्गारली, " जयू आणि योगेश, दोघंही बदमाष आहेत! असं घाबरण्याचं नाटक केलं की आई पाघळेल असं वाटलं होय दोघांना!" शुभदाचं अनपेक्षित हंसणं ऐकून अनंतला भरून आलेलं आभाळ, अचानक ढग पांगून उजळून निघावं तसं वाटलं! मोकळेपणाने श्वास घेत तो म्हणाला, "ती दोघं किती बदमाष आहेत ते मागाहून ठरवूं;-- पण त्यापूर्वी योगेशने काय लिहिलं आहे ते तर समजून घे!"
दुसर्या दिवशी सकाळी ६ च्या सुमारास गॅसवर चहाचं आधण ठेवतांना अनंत मनाशी विचार करीत होता की रात्री शुभदाला शांत झोप लागली असेल की नाहीं? तेवढ्यांत पाठीमागे खुर्ची सरकवल्याचा आवाज आला, म्हणून त्याने वळून पाहिलं तर शुभदा रोजच्यासारखी मुखमार्जन आटपून, डायनिंग टेबलाजवळ खुर्ची ओढून घेऊन बसत होती. नजरानजर होतांच सस्मित चेहर्याने ती म्हणाली, " अहो, असे भूत बघितल्यासारखे काय बघताय्? मीच आहे,-- शुभदा!" " हो, --तुला बघूनच चकित झालो आहे! कारण तुला रात्रभर शांत झोंप लागली असेल की नाहीं याची काळजी वाटत होती! पण तुझा चेहरा चांगली शांत झोप लागल्याप्रमाणे दिसतो आहे!" "थोडा वेळ लागला झोप लागायला;-- पण लागली ती मात्र निवांत! एकदम आत्तां आपोआप जाग आली, रोजच्या वेळेला!" "मनांतलं विचारांचं वादळ शांत झालं असेल तर उत्तमच!" दोघांचे चहाचे कप डायनिंग टेबलावर ठेवीत अनंत म्हणाला. "बेडवर पडल्या-पडल्या मी योगेशने मेलमधे केलेल्या खुलाशावर खुप वेळ विचार करीत होते! शेवटी योगेशच्या तज्ञ डाॅक्टर मित्राने त्या दोघांना जे सांगीतलं ते मलाही पटलं आणि मन एकदम शांत झालं! इतकी वर्षं नियमित काळजी घेत असतांनाही नकळत गफलत होऊन जयूला दिवस गेले असतील आणि झालेली गफलत ध्यानांत येण्यासाठीही मधे दीर्घ काळ गेला असेल तर 'ही परमेश्वराचीच योजना आहे असं समजून तिचा आतां आनंदाने स्वीकार करा' हा डाॅक्टरमित्राचा सल्ला मलाही पटला! मनांत आलं की गेली एवढी वर्षं मी ज्याची वाट बघत ��ोते, ते स्वप्न आतां ऊशीराने कां होईना, प्रत्यक्षांत येत आहे तर मीही आनंदाने त्याचं स्वागत केलं पाहिजे!" "कसं माझ्या मनातलं बोललीस बघ!" शुभदाच्या त्या प्रांजल कबुलीवर अनंत हरखून म्हणाला, "योगेशने मेलमधे खुलासा करण्यापूर्वी त्याच्या तोंडून ही खुशखबर ऐकतांक्षणीं माझ्या मनांत हाच विचार आला होता! त्यामुळे तुझ्या अनपेक्षित चिडचिडीचं मला आश्चर्यच वाटलं होतं!" "मला वाटतं ती चिडचिड म्हणजे 'इतकी वर्षं जयू आणि योगेशने कां वायां घालवली?' या वैफल्याचा उद्रेक होता!! पण परमेश्वराने ऊशीरा कां होईना, त्यांच्या झोळीत आपल्याला हव्या त्या सुखाचं माप टाकलं की!" शुभदा समाधानाने हंसत म्हणाली. "म्हणजे आतां योगेशचा फोन आला की त्याला दोन आठवड्यांनंतरची आपली तिकिटं बुक करायला सांगायची? तेवढा वेळ आपल्याला तयारीला सहज पुरेल! आपला व्हिसा आहेच आणि आपल्याला काय फक्त चार कपडे बरोबर न्यायचे आहेत!" "-- पण योगेशने कशाला तिकिटं बुक करायची?" शुभदाने घुटमळत विचारलं. "मलाही ते एरवी पटलं नसतं! पण मेलमधे योगेशने स्पष्ट बजावलं आहे की आजी-आजोबांचा या आनंदसोहळ्यासाठी जाण्या-येण्याचा खर्च तोच करणार! त्यामुळे यावेळी त्याच्या आनंदाला मला गालबोट लावायचं नाहींये!" "तसं असेल तर ठीक आहे! फक्त मनांत एक धाकधूक आहे: आतां साठीच्या उंबरठ्यावर जयूचं बाळंतपण निभावणं मला झेपेल ना?" "वेडीच आहेस तूं शुभदा!" अनंत मोकळेपणानं हंसत म्हणाला, "तुला थोडंच तिचं बाळंतपण करायचं आहे? योगेशने काय लिहिलंय् ते विसरलीस कां? डाॅक्टरांनी आवश्यक त्या सर्व तपासण्या करून गर्भाची वाढ उत्तम होत असल्याची हमी दिल्यावरही आपली जयू थोडी हबकली आहे, अस्वस्थही आहे;-- या विचाराने की वयाच्या चाळिशीमधे, ऊशीरा आलेलं हे बाळंतपण नीट पार पडेल ना? त्यामुळे फक्त तिला मानसिक आधार वा बळ देण्यासाठी आपण जाणार आहोंत! शिवाय डिलिव्हरी झाल्यावर नवजात बाळाची आवश्यक ती काळजी घेण्यासाठी आजी-आजोबांपेक्षा अधिक योग्य कोण असणार?" "आतां योगेशचा फोन येऊन गेल्यावर मी रजनीला केव्हां एकदा ही गोड बातमी सांगते असं झालंय मला! तसंच पमाताई आणि सप्रेमॅडमनासुद्धां ही गोड बातमी कळवायला हवी ना!" "रजनीला लगेच सांगायला हरकत नाहीं;-- पण पमाताई वा सप्रेमॅडमना फोनवर सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष भेटूनच त्यांचं तोंड गोड करूयां!"
३ ऑगस्ट २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४९
सकाळीं पायीं फिरण्या��ा फेरफटका आटपून अनंत घरी परतला, तेव्हां नाश्ता तयारच होता. नाश्ता संपवून त्याने बाल्कनीच्या दारासमोर खुर्ची ओढून घेतली आणि एकीकडे गरमागरम चहाचे घुटके घेत तो वर्तमानपत्रांतील बातम्यांच्या हेडलाईन्स पाहूं लागला. तेवढ्यांत बाजूलाच ठेवलेला मोबाईल वाजला. येत असलेला काॅल कुणाचा पाहून तो घेत, कीचनमधे चहा-नाश्त्याची भांडी हातासरशी धुुवीत असलेल्या शुभदाला त्याने आवाज दिला, "शुभदा, लौकर बाहेर ये. योगेशचा फोन आला आहे, तो मी स्पीकरवर टाकतोय्!" "गुड माॅर्निंग, बाबा!" पलीकडून अभिवादन करीत योगेशने विचारलं, "आई जवळपास नाहींत कां?" "अरे ती कीचनमधे आहे! येईलच इतक्यात. तुझा फोन आल्याचं मी तिला सांगीतलं आहे" "तर मग आधी स्पीकर बंद करा, प्लीज!" योगेश घाईघाईने म्हणाला, "मला जे कांही सांगायचं आहे ते बोलून झाल्यावर स्पीकर पुन: ऑन करा!" योगेशला आपल्या एकट्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे हे ओळखून अनंतने चट्कन स्पीकर बंद केला आणि मोबाईल कानाच्या अगदी जवळ नेऊन हलकेच म्हणाला , "केला बंद स्पीकर! आतां तूं सरळ बोलत रहा योगेश! शुभदा मधेच बाहेर आली तरी मी सांभाळून घेईन. आज जयूऐवजी तूं काॅल केलेला बघितल्यावरच वाटलं होतं की तुला तसंच महत्वाचं कांही बोलायचं असणार! काय विशेष?" त्यानंतर जवळ-जवळ ५-७ मिनिटे योगेश अनंतशी दबत्या आवाजांत बोलत राहिला! त्यांत खंड पडला तो फक्त शुभदाच्या बाहेर येण्याने. ती आली तशी अनंत निर्विकार मुद्रेनं चुकचुकत तिला म्हणाला, "कट झाला बहुतेक! पण योगेश पुन: लगेच करीलच. तोपर्यंत तूं कीचनमधे जे काय काम राहिलं आहे ते उरकून लगेच बाहेर येऊन बस;--म्हणजे पुन्हां ये-जा करायला नको!" जे महत्वाचं सांगायचं होतं ते बोलून झाल्यावर योगेश म्हणाला, "आतां हा काॅल कट करून मी पुन्हां नव्याने करतो, तेव्हां तुम्ही स्पीकर ऑन करा. म्हणजे चौघांनाही एकत्र बोलतां येईल! हो, जयश्रीही बाजूलाच आहे!"
दोनच मिनिटांत योगेशचा नव्याने फोन आला तेव्हां लगबगीने बाहेर येत शुभदा म्हणाली, "आज योगेश फोन करतोय् म्हणजे नक्कीच कांहीतरी खास असणार!" "योगेश, शुभदा आली आहे आणि फोनही स्पीकरवर आहे! तूं बोल आतां!" "आई आणि बाबा, जयश्री माझ्या बाजूलाच बसली आहे! पण ती स्वत: ही खुशखबर सांगायला लाजते आहे, म्हणून मीच सांगतो! तुम्ही लौकरच आजी-आजोबा होणार आहांत!!" अनंत आणि शुभदा चकीत झाल्यागत एकमेकांकडे बघतच राहिले! पण स्वत:ला चट्कन सांवरीत अनंतने दोघांचं उत्साहाने अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या तर शुभदा थरथरत्या आवाजांत उद्गारली, "अग्गोबाई! खरंच की काय!" आनंदाच्या आवेगात तिला कांंही क्षण पुढे बोलायला सुधरेचना! आनंदाश्रूंनी डबडबलेले डोळे पुसत शुभदा मग म्हणाली, "जयू, तूं आणि योगेश खोटं सांगणार नाहीं याची खात्री असली तरी, अजूनही जे ऐकलं त्यावर विश्वासच बसत नाहीं ग!" "तसं होणं साहजिक असलं तरी योगेशने सांगीतलं ते १०० % खरं आहे, आई! आम्ही दोघांनीही डॉक्टरांकडून पक्की खात्री करून घेतल्यावरच तुम्हांला आज ही हवीहवीशी बातमी कळवली आहे!" एकीकडे स्वत:च्या आवाजावर ताबा ठेवायचे आटोकाट प्रयत्न करीत, पण तरीही भरल्या गळ्याने आईला आश्वस्त करीत जयश्री म्हणाली. यावर काय बोलावं ते अनंत वा शुभदा दोघांनाही न सुचल्याने आणखी कांही क्षण अवघडल्या शांततेत गेल्यावर योगेश समजूतदारपणे म्हणाला, "आई आणि बाबा, तुमच्यासाठी हा धक्का कितीही सुखद असला तरी आकस्मिक आणि अनपेक्षित आहे! त्यामुळे तुमच्या मनांत क���य काय प्रश्न उपस्थित होतील याचा विचार करून मी तुमच्या विविध संभाव्य प्रश्नांची उत्तरे देणारी एक खुलासेवार मेल तयार केली आहे! बाबा, मी तुम्हांला ती लगेच पाठवतो. तुम्ही दोघांनी ती शांतपणे वाचा, समजून घ्या आणि विचार करा! मग आपण उद्यां सकाळी याच सुमारास त्याबद्दल शांत चित्ताने पुन: बोलुयां!"
खरं तर मेल वगैरे न पाठवतां योगेशने फोनवरच आवश्यक ते सर्व तपशील अनंतला समजावून सांगीतले होते! पण शुभदासमोर तर ठरल्यानुसार मेलचं लटकं नाटक करणं भाग होतं! त्यासाठी अनंत बेडरूममधून आपला लॅपटॉप घेऊन आला आणि तो चार्जिगसाठी लावला. अजूनही किंकर्तव्यमूढ अवस्थेत असलेल्या शुभदाच्या जवळ बसत तिला ऐकूं जावं इतपत मोठ्या आवाजांत अनंत म्हणाला, " १५-२० मिनिटांनी मेल चेक करून बघुयां योगेशने एवढा कसला खुलासा केला आहे!" त्याच्या आवाजाने शुभदा खाडकन् भानावर आली! दोन्हीं भुंवयावरचा कपाळाचा भाग गच्च दाबून धरीत, खेदाने मान हलवीत ती म्हणाली, " मला तर कांहीच सुधरत नाहींये! लग्नानंतर म्हणे दोघांनी विचारपूर्वक ठरवलं होतं की आपल्याला मूलच नको! पहिली ५-७ वर्षें मी दातांच्या कण्या केल्या की बाबांनो वेळच्या वेळी मूल व्हायला हवं! पण जयू म्हणजे मुलुखाची हट्टी, 'एकदां ठरवलं ते पक्कं' बाण्याची!! भरीस भर म्हणजे तिला योगेशची साथ! मग काय, एवढी वर्षं वायां घालवली आणि आतां चाळिशीच्या उंबरठ्यावर दोघे आई-बाबा व्हायला निघालेत! -- आणि वरातीमागून घोडी नाचायला हवी�� तसे आपण आजी आणि आजोबा!" शुभदाच्या अस्वस्थ मनाची घालमेल आणि चिडचिड लक्षांत येऊन तिला समजवायचा प्रयत्न करीत अनंत म्हणाला, "शुभदा, आपण त्रागा करण्यांत काय अर्थ आहे? योगेश आणि जयू दोघेही चांगले शिकलेले आहेत, आपापल्या कार्यक्षेत्रांत झोकून देऊन काम करताहेत! म्हणजे दोघेही साधक-बाधक विचार करण्याएवढे सुजाण आणि सक्षम आहेत ना? मग त्यांनी एकमताने घेतलेल्या कुठल्याही निर्णयाला आपण विरोध कां करायचा? लग्नानंतर त्यांनी मुलांबद्दल घेतलेल्या निर्णयामागे त्यांची काही कारणं असतील मग भले ती आपल्याला पटोत वा न पटोत! -- आणि आतां जर तो निर्णय त्यांनी बदलला असेल तर त्याची कारणं आपण समजून तरी घ्यायला हवीत ना?"
२७ जुलै २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४८
मोबाईलवर आलेला काॅल मनोरमाचा आहे हे बघितल्यावर तो घेत शुभदाने चेष्टेच्या सूरांत विचारलं, "भर दुपारी जरा विश्रांती घ्यायचं सोडून फोन कसले करतेस ग?" "तुझ्या विश्रांतीमधे खोडा घातला असेल तर माफ कर;-- पण तुला वेळ असेल तर भेंटायचं होतं म्हणून विचारायला फोन केला होता! पण माझ्यासोबत आणखीही कुणीतरी असेल!" "मी मोकळीच आहे;-- त्यामुळे केव्हांही भेटूं शकतो! पण अशी कोड्यांत बोलूं नको! तुझ्यासोबत कोण येणार आहे ते सरळ सांगून टाक!" "सुहासिनी!" आश्चर्याच्या धक्क्यातून स्वत:ला सांवरीत शुभदा म्हणाली, " खरं सांगतेस? पण डाॅक्टरांनी मॅडमना बाहेर पडायची परवानगी कशी काय दिली?" "डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच सुहासिनीला घडल्या प्रकारातून लौकरांत लौकर बाहेर काढायचे प्रयत्न चालले आहेत! म्हणून तुला मुद्दाम सांगायला फोन केला की तिच्याशी गप्पा मारतांना गेल्या शुक्रवारी जे घडलं त्याचा विषयही काढायचा नाहीं! जणूं कांही घडलंच नाहीं अशा प्रकारे वागायचं-बोलायचं! अशक्तपणामुळे ती घेरी येऊन पडली आणि तिला लागलं असं तिच्या मनावर ठसवायचे हे प्रयत्न आहेत!" मनोरमाच्या विस्तृत खुलाशाने समाधान न होऊन शुभदाने शंका विचारली, "पण आपण कितीही सांगीतलं तरी मॅडमना हे पटेल कां? आणि त्यांनी लिहून ठेवलेली ती चिठ्ठी?" "ती चिठ्ठी भाऊसाहेबांनी फाडून नाहींशी केली आहे! सुहासिनीने चिठ्ठीचा विषय काढला तर 'पॅरॅलिसिसचा झटका येतां येतां आपण मुश्किलीने वाचलो' याच्या घबराटीतून जवळजवळ ३ महिने अंथरूण धरल्याने तुला नाहीं ते भास होत आहेत' असं सांगायचं ठरलं आहे! तिच्या वांट्या��ा आलेल्या सक्तीच्या एकटेपणावर उपाय म्हणून तिला चार माणसांत घेऊन जायला सुरुवात केली आहे! काल संध्याकाळी सारसबागेत गणपतीचे दर्शन घेऊन, तिथेच थोडा वेळ बसून आम्ही चौघेजण मग जरा चेंज म्हणून बाहेर हाॅटेलमधे जेवायला गेलो होतो!" "तुमचे हे प्रयत्न यशस्वी ठरावेत असंच मलाही वाटतं!" शुभदा म्हणाली, "बरं, तुम्ही येणार आहांत तर कांही खायला करून ठेवूं कां?" 'अजिबात नाही! आम्ही अचानक आलो असं भासवायचं आहे ना! तुझ्याकडे जायचं आहे हे अजून सुहासिनीलाही सांगितलेलं नाहीं! आम्ही आल्यावर बघूं;--- गप्पांच्या ओघांत तिलाच विचारून काय जमेल ते कर!" "किती वेळांत याल?" "आपला हा काॅल संपला की मी लगेच सुहासिनीकडे जाणार आहे! त्यामुळे तिच्याकडून तुझ्या घरी येईपर्यंत एकुण तासभर तरी लागेल!"
अनंत घरी परत आला तेव्हां संध्याकाळी ७ वाजूून गेले होते. तो फ्रेश होऊन कीचनमधे येऊन बसला तशी त्याच्या पुढे गरमागरम चहाचा कप ठेवीत शुभदा म्हणाली, "बाहेर कांही खाऊन आला असाल तर किती भूक आहे ते सांगा. मी त्याप्रमाणे जेवणाची तयारी करीन." "असा कसा मी बाहेर कांही खाऊन येईन?" अनंत डोळे मिचकावीत म्हणाला, "सप्रेमॅडमसाठी तूं खास कांहीतरी बनवलं असशील त्याला मग उचित न्याय कोण देणार? मला तर आता सणसणून भूक लागली आहे!" "म्हणजे त्या येणार आहेत हे तुम्हांला ठाऊक होतं?" चकीत होऊन शुभदाने विचारलं, "मग मला कां सांगीतलं नाहीं?" "नाहीं,नाहीं! जेवण झाल्यावर मी मनोहरपंतांबरोबर 'स्वयंसिद्ध'च्या कामासाठी बाहेर पडलो, तेव्हां मला कांहीच कल्पना नव्हती. पण वाटेमधे त्यांनी आज मनोरमावहिनी आपल्या घरीं सप्रेमॅडमना कशासाठी घेऊन येणार आहेत ते मला सविस्तर सांगीतलं! कित्येक महिन्यांनी तुम्ही भेटला असाल ना? आतां कशी आहे त्यांची तब्येत?" "जयू परत गेल्यावर मध्यंतरी २ वेळां कांंही कारणा-निमित्ताने आमची ओझरती भेट झाली होती;-- पण मोकळेपणाने गप्पा मारण्यासाठी हवा तो वेळ मात्र आजच मिळाला! मोठ्या शर्थीने परतवून लावलेल्या, आकस्मिक पॅरॅलिसिसच्या झटक्याच्या चालण्या-बोलण्यांत आढळणाऱ्या पुसट खुणा वगळतां त्यांची तब्येत चांगली वाटली! मुख्य म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न झालाच नाहीं असं चित्र उभं करण्याचे सर्वांचे आटोकाट प्रयत्न यशस्वी होताहेत असं खात्रीने जाणवलं!" "ते कसं काय?" "अहो, मॅडम नेहमींच्या मोकळेपणाने सर्व चालूं घडामोडींबद्दल खेळीमेळीने भाष्य करीत होत्या! जयूने मागच्या भेटीनंतर त्यांच्याशी संपर्क ठेवला असल्याचंही त्यांच्या बोलण्यात आलं! पण अलीकडे दीर्घ आजारपणामुळे त्यांनाच उत्तरादाखल मेल पाठवतां ��ली नाही म्हणाल्या! त्यामुळे तिच्या सध्यांच्या हालहवालीची त्यांनी खुप आपुलकीने चौकशी केली! त्या अजूनही जयूचा उल्लेख प्रेमाने 'बबली' असाच करतात बरं कां!" "अरे वा! कांही म्हण, पण आपल्या जयूवर खरंच जीव आहे त्यांचा!" कौतुकाने मान डोलावीत अनंत म्हणाला, "जयूला त्यांच्या अलीकडच्या आजारपणाबद्दल माहीत नसणार! आतां तिचा फोन येईल तेव्हां तिला थोडक्यांत कल्पना दे, म्हणजे ती संपर्क साधेल! जमलं तर सरप्राईज म्हणून मॅडमना व्हिडिओ काॅल कर असं सांगायला हवं जयूला" "खरंच, 'बबलीचा काॅल आला!' म्हणून किती हरखून जातील मॅडम!" मनोमन कल्पनाचित्र रंगवीत शुभदा उत्साहाने म्हणाली, "नक्की सुचवूंया आपण जयूला मॅडमना व्हिडिओ काॅल करण्याबद्दल! पण मला आतां सांगताहांत, त्याची आठवण करून द्यायचं तुम्हीही लक्षांत ठेवा! नाहींतर जयूचा फोन आला की बाकी सगळं बोलतांना, तिला 'मॅडमना व्हिडिओ काॅल कर' असं सांगायचं नेमकं राहून जायचं!" "मनोहरपंतांच्या म्हणण्यानुसार डाॅक्टरांनी दिलेल्या सल्ल्याबाबत खुद्द भाऊसाहेबही आधी साशंक होते! पण बायकोच्या तब्येतीमधे झपाट्याने झालेली सुधारणा पाहून त्यांचाही उत्साह आतां दुणावला आहे! विशेषत: घडल्या प्रकाराबाबत गिरीश आणि शिरीष कसे वागतील, या भीतीचं दडपण, त्या दोघांना वकीलसाहेबांनी दिलेल्या जमालगोट्यामुळे पुरतं नाहींसं झाल्याने ते आतां आम्हां सर्व मित्रमंडळींशी खुप मोकळेपणाने बोलूं लागले आहेत!!"
२० जुलै २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४७
"उद्यां सकाळी त्यांना इथून घेऊन जाणार म्हणजे?" भोसलेंच्या त्या धारदार प्रश्नाने शिरीष क्षणभर चमकला;--पण लगेच ऊसळून म्हणाला, "काका, आम्ही दोघांनी माॅम-डॅडचं हे वागणं गपगुमान चालवून घ्यावं अशी तुमची अपेक्षा आहे कां? त्या दोघांना इथे एकट्याने राहुं देण्यांत केवढा मोठा धोका आहे हे तुम्ही आज स्वत: पाहिलं आहे ना? म्हणून आम्ही त्यांना आमच्यासोबत राहण्यासाठी उद्यां इथून घेऊन जायचं ठरवलं आहे!" "त्यांच्या मनाविरुद्ध? त्यांना हा फ्लॅट सोडून इतरत्र कुठेही जाण्याची इच्छा नाही हे तुम्हां दोघांना पुरतं माहीत आहे. तरीही तुम्ही 'त्यांनी हा फ्लॅट सोडून तुमच्यासोबत रहावं' हा दुराग्रह चालूं ठेवला, म्हणूनच तुमच्या आईने आज सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला याची तुम्हांला जाणीव आहे?" भोसलेंनी सरळ मुद्द्यालाच हात घातल्याने गिरीश आणि शिरीष चांगलेच अस्वस्थ झाले. काय उत्तर द्यावं हे न सुचून दोघे एकमेकांकडे बघत राहिले! कांही क्षणांनी गिरीश तावातावाने म्हणाला, "नाहीं,नाहीं;-- हे साफ खोटं आहे! माझी खात्री आहे की गेल्या कांही महिन्यांतील सततच्या गंभीर आजारपणाला कंटाळून आलेेल्या नैराश्यापोटी माॅमने हे केलं असणार!" "म्हणजे भाऊसाहेबांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी पोलीस चौकीमधे नोंदवलेलं स्टेटमेंट खोटं आहे असं तुम्हांला म्हणायचं आहे कां?" पोलीसांचं नांव ऐकून दोघेही एकदम गांगरले! गिरीशने चांचरत विचारलं, "पोलीसांकडे जाण्याची काय गरज होती?" "भरवस्तीमधे खळबळजनक घटना लपून रहात नाहींत!" अनंतने पुढे येत खुलासा केला, "पोलीसांना कुणी कळवलं माहीत नाहीं;-- पण दुपारीं पोलीस चौकीतून घडल्या प्रकाराबाबत विचारणा करणारा फोन आला होता, म्हणून थोड्या वेळापूर्वी भाऊसाहेब आणि भोसलेकाका पोलीस चौकीत जबाब नोंदवून आले आहेत! तुम्ही दोघे आलांत तेव्हां आम्ही भाऊसाहेबांचे सगळे मित्र त्याबाबतच बोलत होतो!"
आतापर्यंत एका बाजूला बसून सगळं संभाषण ऐकत असलेले एक ज्येष्ठ मित्र पुढे येऊन गिरीश आणि शिरीषना उद्देशून म्हणाले, "मी वसंत बागवे. वयोमानानुसार मी आतां निवृत्ती पत्करली असली तरी ४० वर्षांपेक्षाही अधिक माझा वकिली पेशाचा अनुभव आहे. सकाळी एकत्र फिरायला जातांना होणारं संभाषण आणि साप्ताहिक गप्पांनिमित्त गांठी-भेटींव्यतिरिक्त माझा भाऊसाहेबांचा वैयक्तिक दोस्ताना नाही! तथापि आज सकाळी त्यांचं आयुष्य हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर वाटणाऱ्या सहानुभूतीपोटीं, एक हितचिंतक म्हणून मी तुमच्या घरीं आलो! मात्र इथे आल्यापासून मी जे ऐकलं आणि पाहिलं त्यावरून मी तुम्हां दोघां भावांना एक सल्ला देईन की आई-बाबांना त्यांच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने इथून घेऊन जाण्याचा विचारही मनांत आणूं नका! अन्यथा पोलीस चौकीत भाऊसाहेबांनी नोंदवलेल्या जबाबाचं तक्रारीत रूपांतर करायला अजिबात वेळ लागणार नाहीं!" त्या अनाहूत वकिली सल्ल्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य दोघांच्याही चट्कन लक्षांत आलं. नमतं घेऊन हात जोडीत गिरीश म्हणाला, "माॅम आणि डॅडबद्दल वाटणाऱ्या काळजीमुळेच आम्ही त्यांना आमच्यासोबत घेऊन जाण्याचा विचार केला होता! त्यांच्याबाबतीत कुठलीही जबरदस्ती करण्याचा प्रश्नच नाहीं!" "तसं असेल तर उत्तमच आहे!" भोसले म्हणाले, "प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अनेक पर्याय आहेत! तुम्ही आई-बाबांच्या नजरेतून त्यांचा विचार करा. भाऊसाहेबांचे हितचिंतक मित्र या नात्याने आम्हीही त्याबाबत विचार करुं आणि मग सगळे एकत्र भेंटूनच काय ते ठरवूं" "तथापि त्यापूर्वी तुमच्या आई-बाबांनी सध्याच्या मानसिक तलावातून पूर्णत: बाहेर येणं आवश्यक आहे!" मनो��मा म्हणाली, "त्यासाठी तुम्ही दोघांनीही त्यांना कुठल्याही प्रकारे मनस्ताप होईल असं न वागण्या-बोलण्याची काळजी घेतली पाहिजे!"
सारं कांही निमूटपणे ऐकत बसलेले भाऊसाहेब कसल्यातरी विचारांत हरवल्यागत झाले होते. त्यांची ती विमनस्क अवस्था आणि त्यांच्यासाठी जमलेला मित्रांचा मोठा गोतावळा बघून 'आपण इथून शक्यतों लौकर काढता पाय घेतला पाहिजे' याची जाणीव गिरीश आणि शिरीष यांना झाली. भोसलेंना एका बाजूला बोलावून गिरीश नम्रपणे म्हणाला, "काका, आम्ही आलो तेव्हां इथे काय परिस्थिती असेल या विचाराने प्रचंड हादरलेलो होतो;- पण तुम्ही ही एवढी सीरियस सिच्युएशन ज्याप्रकारे हॅन्डल केली आहे त्याला तोड नाहीं! तु��्ही आणि तुमचे एवढे सगळे मित्र डॅडच्या सोबत असतांना आम्हांला आतांं काळजी करायचं कारणच नाहीं!" "खरंच काका, आज माॅम आणि डॅडसाठी तुम्ही जे केलं त्याची परतफेड आम्ही करूंच शकणार नाहीं! तथापि शारीरिक कष्टांच्या जोडीने तुम्ही निदान आर्थिक झीज तरी सोसूं नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे!" म्हणत शिरीषने आपल्या खिशातून नोटांचं बंडल काढलं आणि ते बळेंच भोसलेंच्या हातांत ठेवीत तो पुढे म्हणाला, "घरुन निघतांना हाताशी आले ते वीस हजार रुपये तूर्तास खर्चासाठी ठेवा;-- अधिक लागतील ते नक्की सांगा!" "डॅड आतां कांहीच बोलायच्या अवस्थेमधे नाहींयेत. त्यामुळे काकू म्हणाल्या तसा त्यांना कुठलाही मनस्ताप होऊं नये म्हणून आम्ही आत्ता त्यांच्याशी कांहीच बोलणार नाहीं! पण उद्यां फोनवर वेळ ठरवून आपण पुन: भेटुयां, तेव्हां बघूं!!" सर्वांकडे वळून आभार मानण्यासाठी दोघांनी मूकपणे हात जोडले आणि दार उघडून ते चट्कन बाहेर पडले! ते दोघेही निघून गेल्यावर इतका वेळ जाणवणारा वातावरणातील ताण एकदम निवळल्यागत झाला आणि हलक्या आवाजांत एकमेकांशी गप्पा सुरु झाल्या! सर्वांना ऐकूं जाईल अशा स्वरांत मनोरमा भोसलेंना उद्देशून म्हणाली, "अहो, आतापर्यंत कुणाला चहा-काॅफी विचारायचंही सुचलं नाही! पण आतां मात्र मी आणि शुभदा चट्कन चहा-काॅफीचं बघतो! तुम्ही चहा किती, काॅफी किती आणि त्यांत बिनसाखरेचे किती हे सर्वांना विचारून सांगाल कां?" ते ऐकून झोंपेतून खडबडून जाग यावी तसे भाऊसाहेब भानावर आले आणि घाईघाईने म्हणाले, "नाहीं,नाहीं वहिनी! तुम्ही दुपारपासून खुप धांवपळ केलेली आहे;-- तरी आतां आणखी कांही करायचं नाहीं! मनोहर मी तुम्हांला एका घरपोच सेवा देणाऱ्या गृहस्थांचा नंबर देतो. त्यांना फोन करून चहा-काॅफी-सरबत जे हवं ते मागवून घ्या! सोबत कांहीतरी खाण्यासाठीही मागवून घ्या! इतका वेळ झाला तरी कुणालाच भूक कशी नाहीं लागली?"
१३ जुलै २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४६
भाऊसाहेबांनी केलेल्या त्या स्पष्ट खुलाशानंतर एक विचित्र शांतता पसरली! त्यावर कुणालाच कांही बोलण्याचा धीर झाला नाहीं. एका बाजूला खुर्चीवर ऐकत बसलेल्या मनोरमावर मात्र भाऊसाहेबांच्या खुलाशाचा वेगळाच परिणाम झाल्याचं शुभदाला जाणवलं. तिची अचानक वाढलेली अस्वस्थता पाहून शुभदाने मनोरमाच्या चाळवाचाळव करणाऱ्या हातांवर शांतपणे आपला हात ठेवीत तिला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि नजरेच्या खुणांनीच 'तुला जे कांही बोलायचं आहे ते लगेच आणि स्पष्टपणे बोल' असं सुचवलं. "माफ करा भाऊसाहेब," मनोरमा शांततेचा भंग करीत म्हणाली, "तुम्ही मुलांनी जे सुचवलं त्याला सुहासिनीचा ठाम विरोध असल्याचं सांगीतलं, पण त्याची कारणं नाहीं सांगीतली!" "मनोरमा, अग तूं मधेच हे काय --" म्हणत तिला थांंबवायचा प्रयत्न करणाऱ्या भोसलेंना अडवून मनोरमा शांतपणे म्हणाली,"मला बोलूं द्या, मनोहर! खरं तर ही कारणं सुहासिनीने स्वत: सांगणं अधिक योग्य ठरलं असतं, पण आतां ती बोलायच्याही अवस्थेत नाहीये! तिचं म्हणणं या सर्वांसमोर आलं नाहीं तर परिस्थितीचं गांभीर्य कुणालाच समजणार नाहीं!" त्यावर भोसलेंनी भाऊसाहेबांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं! भाऊसाहेबांनी मूकपणे संमतीदर्शक मान डोलावली तशी मनोरमा सर्वांना उद्देशून पुन: बोलूं लागली, "सुहासिनीकडून तिच्या अलीकडच्या आजारपणांत मला जे समजलं तेच मी थोडक्यात सांगणार आहे! सुहासिनीचं स्पष्ट मत होतं की मुलांना दाखवताहेत तसा आई-बाबांचा कळवळा वगैरे कांही आलेला नसून गेली पांच वर्षं तरी दाबूून ठेवलेली मनीषा त्यांना पूर्ण करायची आहे!" "कुठल्याही कारणास्तव कां होईना, मुलं आई-बाबांची काळजी घेणार असतील तर हरकत काय आहे?" एका ज्येष्ठ स्नेह्याने विचारलं.
"तेच तर मी सांगतेय् की सुहासिनीच्या मते मुलांचा खरा हेतू काळजी घेण्याचा नसून वेगळाच होता! धाकट्या शिरीषने ५ वर्षांपूर्वी वेगळं बिऱ्हाड केलं तेव्हांच दोघां भावांनी 'माॅम आणि डॅडने त्यांच्याबरोबर रहावं' असं सूतोवाच केलं होतं! त्यावेळी नकार देतांना सुहासिनीने स्पष्ट शब्दांत सांगीतलं होतं की 'तुमच्या लग्नांनंतर सर्वांनी एकत्र रहावं म्हणून तर होता तो बंगला विकून त्याच परिसरात आम्ही हा ४ बेडरूमचा फ्लॅट घेतला! तथापि तुम्हां दोघांनाही स्वतंत्र राहायचं असेल तरी आमची हरकत नाही;-- पण हा फ्लॅट सोडून आम्ही कुठेही येणार नाहीं. गेली ३५ वर्षांहून अधिक काळ इथे राहिल्याने या परिसराशी आमची जणूं नाळ जोडली गेली ���हे. त्यामुळे आतां या वयांत दुसरीकडे नव्याने बस्तान बसवणं शक्य नाहीं.' ते ऐकून दोघेही खूप नाराज झाले होते!" "पण मुलांना उतारवयात आई-बाबांनी एकटं राहण्याबाबत काळजी वाटणे साहजिक नाहीं कां?" दुसर्या एका ज्येष्ठ स्नेह्याने विचारलं "सुहासिनीशी याबाबत भाऊसाहेब सहमत नसले, तरी सुहासिनीच्या मते मुलांचा डोळा फक्त हा फ्लॅट विकून येणाऱ्या भल्यामोठ्या रकमेवर होता! कारण त्यांनी कधीही असं म्हटलं नाहीं की 'हा फ्लॅट विकून येणाऱ्या पैशांतून तुमच्यासाठी आमच्या जवळ नवीन फ्लॅट घेऊंया'. गेल्या ५ वर्षांत या फ्लॅटची किंमत अधिकच वाढली आहे हे उघड आहे!!" एवढ्यांत कुणीतरी उतावीळपणे अधिक वेळ बटन दाबून धरावे तशा प्रकारे डोअरबेल कर्कश्श वाजली. भाऊसाहेबांना बसून राहण्याची खुण करीत भोसलेंनी चट्कन पुढे होऊन दार उघडलं तशी गिरीश घाईघाईने आंत आला. पण जमलेल्या लोकांना बघून कांहीसं चकित होत त्याने तीक्ष्ण स्वरांत भाऊसाहेबांना विचारलं, " डॅड, माॅम कुठे आहे? आणि तुम्ही ही कोण लोकं, कशासाठी जमा केली आहेत?" " डॅड, तुम्हांला दिवसभरांत फोन करून दादाशी किंवा माझ्याशी बोलावंसं नाहीं वाटलं?" गिरीशच्या मागोमाग आलेल्या शिरीषने विचारलं. त्याच्या स्वरांतला उपहास लपण्याजोगा नव्हता!
"गिरीश आणि शिरीष, तुम्हांला वाटणारी काळजी आम्ही सगळे समजूं शकतो! तथापि माझी विनंती आहे की तुम्ही शक्य तेवढ्या हळूं आवाजांत बोलावं!" आपल्या आवाजावर ताबा राखीत भोसले अत्यंत शांत स्वरांत म्हणाले, "भाऊसाहेब या घडीला कुठलाही संवाद साधण्याच्या मनस्थितीत नाहींत, हे तुम्ही दोघांनी लक्षांत घ्यायला हवं! त्यामुळेच मी स्वत: तुम्हां दोघांनाही फोन करण्याचा प्रयत्न केला! पण फोन लागला नाहीं;-- तेव्हां तुम्ही महत्वाच्या कामांत बिझी असाल हे ओळखून मी तुमच्या मोबाईलवर मेसेज पाठवले, ते तुम्ही बघितले नाहीं कां?" भोसलेंनी शांत स्वरांत केलेला खुलासा ऐकून गिरीश आणि शिरीष दोघेही वरमले. पुढे केलेल्या खुर्चीवर बसत गिरीश म्हणाला, "काका, तुमचा मेसेज शिरीषने प्रथम बघितला आणि मला लगेच कळवलं! म्हणून तर आम्ही ताबडतोब इथे आलो आहोंत!" दोघांच्या वागण्या-बोलण्याचा एकुण रागरंग पचनी न पडल्याने खुप चिडलेली मनोरमा पुढे येत लागट स्वरांत म्हणाली, "नशीब म्हणायचं की भोसलेकाकांना तरी तुम्ही ओळखलंत! आणि काय रे, तुम्ही आई-बाबांची विचारपूस करायला आला आहांत की त्यांना जाब विचारायला?" "माफ करा काकु!" गिरीश चट्कन हात जोडून म्हणाला, "काळजीपोटी आम्ही कांही कमीजास्त बोललो असूं हे प्लीज समजून घ्या! माॅमला आम्ही भेंटूशकतो कां?प्लीज?" "सुहासिनीची तब्येत ठीक आहे आतां, पण औषधांच्या परिणामाने तिला गाढ झोंप लागली आहे! हवं तर तिला बघून या, पण ��ठवूं नका!" मनोरमा म्हणाली, "डाॅक्टर म्हणाले आहेत की ती आपणहून उठेल तेव्हां तिची तब्येत ठणठणीत झालेली असेल!" "माॅमला शांत झोप लागली असेल तर आपण तिला आत्ता नको भेंटुया!" गिरीशला उद्देशून शिरीष म्हणाला, "उद्यां सकाळी त्यांना घेऊन जायला येऊं, तेव्हांच एकदम भेंटुया!"
६ जुलै २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४५
घरी परतल्यावरही भाऊसाहेब भकास चेहर्याने एका खुर्चीवर अंग चोरून बसून होते. त्यांच्या जवळ जाऊन भोसलेंनी विचारलं, "भाऊसाहेब, आपली मित्रमंडळी येईपर्यंत तुम्ही थोडा वेळ पडतां कां? बेडवर आडवे होऊन विश्रांती घेेतलीत तर तुम्हांला बरं वाटेल, तरतरी येईल!" भाऊसाहेबांनी यांत्रिकपणे मान हलवली तशी भोसलेंनी त्यांना ऊठण्यासाठी आधार दिला आणि बेडरूमकडे घेऊन गेले! विकलपणे हळुहळु पावलं टाकीत जाणाऱ्या त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे भरल्या डोळ्यांंनी बघत मनोरमा म्हणाली, "दहा तासांत दहा वर्षांनी म्हातारे झाल्यासारखे वाटतात ग! सत्तरी पार केल्यावरही त्यांच्या अंगात सतत केवढा उत्साह असायचा, शुभदा! तसे बोलघेवडे नव्हते, पण जे कांही मोजकं बोलायचे ते अगदी मार्मिक. चेहरा कायम प्रफुल्लित. त्यांना कधी चिंताक्रांत वा दुर्मुखलेलं पाहिल्याचं आठवतच नाहीं. त्यामुळे त्यांची ही अवस्था अधिकच केविलवाणी वाटते ग!" " जबर मानसिक धक्क्यामुळे ते खचले आहेत, मनोरमा!" शुभदा तिला समजावीत म्हणाली, "थोडी विश्रांती मिळाली की आपोआप भानावर येतील! तूं म्हणतेस तसा त्यांचा मूळ स्वभावच आनंदी आणि उत्साही असला, तर मित्रमंडळींशी बोलून मन मोकळं केल्यावर ते नक्की पूर्वपदावर येतील!" "येतीलच आमची मित्रमंडळी एवढ्यांत!" कीचनमधे येत भोसले म्हणाले, "आम्ही एकुण तेरा जण असूं! दोघे कांही वैयक्तिक कारणाने येणार नसल्याचं अनंतराव म्हणाले. तुम्ही दोघी बाहेर आलांत तर पटकन सर्वांसाठी बसण्याची व्यवस्था बघून घेऊं. मला वाटतं कीचनमधल्या कांही खुर्च्या बाहेर न्याव्या लागतील!"
भाऊसाहेबांना भेटण्यासाठी एकत्र जमलेल्या आपल्या मित्रमंडळींना उद्देशून भोसले म्हणाले, "मी आतां भाऊसाहेबांंना घेऊन येतो. आपणां सर्वांना त्यांचा मितभाषी स्वभाव ठाऊकच आहे;-- पण आज तरी त्यांनी मनांत जे कांही आहे ते सगळं घडाघडा बोलून मोकळं होणं आवश्यक आहे. त्यांना बोलकं करण्यासाठी आपणां सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील! फक्त एका वेळी एकानेच बोलावं आणि तेही शक्य तेवढ्या सौम्य भाषेत असं वाटतं!" दहा- बारा मिनिटांतच भोसलेंब���ोबर भाऊसाहेब बाहेर आले! त्यांचा गंभीर पण शांत चेहरा पाहून त्यांच्या मित्रमंडळींना हायसं वाटलं! आल्या आल्या हात जोडून भाऊसाहेब म्हणाले, "माफ करा मित्रांनो, आजच्या पार्टीचा माझ्या पत्नीमुळे विचका झाला!" चटकन पुढे होऊन भाऊसाहेबांनी जोडलेले हात स्नेहभराने आपल्या हातीं घेत एक ज्येष्ठ मित्र म्हणाले, "माफी कसली मागताय्, भाऊसाहेब! अहो,आजच्या एका पार्टीचं काय घेऊन बसलाहांत;--आपण तर सतत पार्ट्या करीतच असतो की! आधी वहिनी कशा आहेत ते आम्हांला सांगा!" "तुम्हां सर्वांच्या सदिच्छांमुळे तिला कसलीही गंभीर इजा झालेली नाही!" एवढया साऱ्या मित्रांच्या उपस्थितीमुळे भारावलेले भाऊसाहेब म्हणाले. "म्हणजे धोका टळला ना!" दुसरे एक ज्येष्ठ मित्र भाऊसाहेबांना घट्ट आलिंगन देत म्हणाले, "जिवावर बेतलेलं शेपटीवर निभावलं!" आपल्या दोन्ही ज्येष्ठ मित्रांना आपापल्या जागेवर बसण्याची खूण करीत भोसले भाऊसाहेबांना त्यांच्यासाठी रिकाम्या ठेवलेल्या जागेपाशी घेऊन गेले. भाऊसाहेबांना आग्रहाने तिथे बसवून भोसले म्हणाले, "भाऊसाहेब, वहिनी सुखरूप आहेत हे ऐकून इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला किती बरं वाटलं असेल ते शब्दांत सांगण्याची गरज नाहीं! मात्र 'हे जिवावरचं संकट वहिनींनी कां ओढवून घेतलं' ते तुम्ही सर्वांना सांगणं अतिशय गरजेचं आहे!"
"माझ्या मुलीच्या शिक्षिका म्हणून मी ज्यांना ओळखतो, त्या मनमिळाऊ आणि हंसतमुख सप्रेमॅडम एवढं टोकाचं पाऊल उचलुं शकतील हे मला अजूनही खरं वाटत नाहीं!" अनंत शांत पण आग्रही स्वरांत म्हणाला, "त्यामागे तसंच कांही गंभीर कारण असलं पाहिजे;-- आणि ते तुम्ही सांगीतल्याविना कुणालाही ओळखतां येणार नाहीं! भाऊसाहेब, अगदी तुमचे जवळचे मित्र असलेल्या मनोहरपंतांनाही!! "अनंतराव म्हणाले ते १०० टक्के खरं आहे!" भोसले म्हणाले, "तुमचा हा मित्रपरिवार इथे जमला आहे तो फक्त तुमची समस्या जाणून घेऊन तिच्यावर कायमचा उपाय शोधण्यासाठी! पण मूळांत समस्याच समजली नाहीं, तर उपाय कसा शोधणार?" भोसलेंच्या कळकळीच्या आवाहनात जाणवणाऱ्या मित्रपरिवाराच्या आपुलकीने भाऊसाहेबांना भरून आलं! ते सद्गदित स्वरांत म्हणाले, "घराघरांत घडणारं महाभारतच या घटनेमागे आहे! जास्त लांबण न लावतां एवढंच सांगतो की आमचे दोन्ही चिरंजीव गिरीश आणि शिरीष आम्ही त्यांच्या सोबत रहावं म्हणून मागे लागले होते;-- पण सुहासिनीला ते अजिबात मान्य नव्हतं!" "पण ते दोघे तर स्वतंत्र राहतात ना?" कुणीतरी शंका उपस्थित केली. " हो! लग्न झाल्यावर नोकरीच्या सोयीसाठी दोघे आमच्या संमतीने वेगळे राहूं लागले!" नजिकच्या भूतकाळातील आठवणी जागवीत भाऊसाहेब सांगू लागले, "सगळं कसं सुरळीत चाललं होतं;-- पण अचानक २ महिन्यांपूर्वी पॅरॅलिसिसचा झटका सुहासिनीच्या दरवाजावर टक��क करून गेला! ऐनवेळी लक्षणं ओळखून डाॅक्टरांनी योग्य ते उपचार तांतडीने केल्यामुळे पॅरॅलिसिसमधून ती वाचली;-- पण तिच्या एकुण हालचालींवर खुप मर्यादा आल्या! ते समजल्यापासून चिरंजीवांनी 'तुम्हांला एकटं राहूं देण्याचा धोका आम्हांला पत्करायचा नाहीं!' असा धोशा लावला! आम्ही खुप विरोध केला, पण दोघे आतां हट्टालाच पेटले आहेत! येत्या २-४ दिवसांत आम्हांला इथून घेऊन जाण्याची तयारी त्यांनी सुरु केली आहे! हे समजल्यावर कमालीची हतबल होऊन बहुधा सुहासिनीने करूं नये ते केलं असावं!"
२९ जून २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४४
शुभदाने स्वाधीन केलेल्या पिशवीतून सामान बाहेर काढून ठेवीत मनोरमा म्हणाली, "शुभदा, तूं येशील म्हणून मी चहा करायची थांबले होते! घरी पिऊन आली असलीस तरी माझ्याबरोबर पुन: घेशील ना?" "तुला कंपनी देण्यासाठी घेईन अर्धा कप;--पण तोपर्यंत मी एकदां सुहासिनी मॅडमना बघून येऊं कां? ह्यांच्या तोंडून ती भयानक बातमी ऐकल्यापासून जिवाला चैन नाहींये!" शुभदाला बेडरूमचं दार उघडून देऊन मनोरमा कीचनकडे वळली. शुभदाने दारातूनच डोकावून बेडकडे बघितलं तर अंगावर व्यवस्थित घातलेल्या पांघरुणाखाली सुहासिनीमॅडमचं शरीर दिसतच नव्हतं! दिसत होता तो फक्त त्यांचा निद्रिस्त शांत चेहरा आणि त्याभोंवतीची दाट शुभ्र केसांची महिरप! भूतकाळातील अनेक आठवणी मनांत दाटल्यामुळे शुभदा जागींच खिळल्यागत ऊभी राहून बघत असतांना नकळत तिचे डोळे भरून आले आणि हलक्या हाताने बेडरूमचं दार लावून ती परत फिरली. तिची चाहूल जाणवून मनोरमा म्हणाली, "कीचनमधेच ये, शुभदा!" साश्रू डोळ्यांनी विमनस्कपणे बसलेल्या शुभदापुढे चहाचा कप ठेवीत मनोरमा म्हणाली, "भाऊसाहेब त्यांच्या परीने ह्यांना 'स्वयंसिद्ध अनाथाश्रमा'साठी देणग्या गोळा करायला मदत करीत असतात. त्यातूनच माझी सुहासिनीची ओळख झाली! पण तुझी तिच्याशी ओळख कशी?"
"आमची जयू ८ वीत असतांना सुहासिनी मॅडम तिच्या क्लासटीचर होत्या. सायन्स विषयही त्याच शिकवायच्या. शिक्षणाचा प्रात्यक्षिक भाग म्हणून त्या हौसेनं स्टडी टुर काढीत! अशाच एका टुरनंतर त्यांनी 'भेटायला या' म्हणून निरोप पाठवला!" शुभदा भूतकाळाच्या आठवणी जागवीत सांगू लागली, "पण ह्यांना कुठे ऑफिसच्या कामांतून वेळ मिळायला! चार दिवस वाट बघून शेवटी मी एकटीच भेटायला गेले. पहिल्या�� भेटीत त्या जयूचं वनस्पतींबद्दलचं कुतूहल आणि निरीक्षण यांबाबत भरभरून बोलल्या! जयूचे इतर छंद आणि आवडींची आस्थेनं चौकशी केली! जयू ९ वीत गेल्यावरही त्यांनी तिच्या प्रगतीमधे रस घेतल्याने आमच्या भेटी होत राहिल्या, ओळख वाढत गेली!" "मीसुद्धां अनेकांकडून तिच्या जीव ओतून शिकवण्याबद्दल ऐकलं आहे!" मनोरमा म्हणाली, "बाहेर पडली तर अजूनही तिचे जुने विद्यार्थी मोठ्या आदराने तिला भेटतात!" "पांच वर्षांपूर्वी जयू आली होती तेव्हां कपड्यांच्या दुकानांत आम्ही खरेदी करीत असतांना तिने अचानक मॅडमना ओझरतं पाहिलं आणि धांवतच जाऊन त्यांना गांठलं! तिथंच त्यांच्या पायां पडली तेव्हां "अग, बबली तूं?" म्हणतांना मॅडमना केवढा आनंद झाला होता! खरेदी राहिली बाजूला आणि त्यांच्या गप्पा संपेनात, तेव्हां 'एकदां आरामांत गप्पा मारायला घरी ये' म्हणाल्या होत्या! पण जेमतेम दोन आठवड्यांच्या मुक्कामामुळे जयूला नाहींच जमलं! परत जातांना ती 'मॅडमना पुन: भेटतां आलं नाही' म्हणून जाम हळहळली होती!कारण पुढे ज्या वनस्पतींविषयक संशोधनक्षेत्रांत जयूने स्कॉलरशिप मिळवून डाॅक्टरेट केली, त्यातली तिची रुची आणि कल ओळखून मॅडमनी तिला प्रोत्साहन दिलं! आपल्या करीअरचा पाया घालण्याचं श्रेय ती नेहमी मॅडमनाच देते!"
"जयूचं टोपण नांव 'बबली' असल्याचं मला आजच समजलं!" मनोरमा कौतुकाने म्हणाली. "जयू लहान असतांना आम्ही भाड्याच्या जागेत रहात होतो तिथे शेजारी शर्मा कुटुंब होतं! त्यांच्या घरांत समवयस्क लहान मुलं असल्याने जयू तिथे रमायची!शर्मा मंडळीनीच तिला 'बबली' म्हणायला सुरुवात केली. तिच्या 'बबली' या टोपणनांवाचं सुहासिनी मॅडमना केवढं अप्रूप!'किती वेगळं आणि गोड आहे' म्हणायच्या आणि कौतुकाने हंसायच्या!" "नांवाप्रमाणे सतत हंसत असायची!" खेदाने मान हलवीत मनोरमा म्हणाली, "पण आज ही काय वेळ आली बघ तिच्यावर!" "विषय निघाला, म्हणून विचारतेय्--" काहीशी चांचरत शुभदा म्हणाली, "मॅडमचा आत्महत्येचा प्रयत्न ऐनवेळी कुणी हाणून पाडला?" "सकाळी भाऊसाहेब नेहमीप्रमाणे शुक्रवारच्पा गप्पांच्या बैठकीला गेल्यावर सुहासिनीने 'जगण्यांत रस न उरल्याने मी स्वतःहून आयुष्य संपवीत आहे. याबाबत इतर कुणालाही दोष देऊं नये!' अशा आशयाची चिठ्ठी लिहून बेडवर ठेवली! त्यानंतर ती जीव देण्यासाठी बेडरूमच्या खिडकीतून उडी मारणार होती. पण आठव्या मजल्यावरून खाली बघितल्यावर तिला बहुधा भोंवळ आली आणि ती आंतल्या बाजूला पडली! तो आवाज ऐकून खालच्या फ्लॅटमधले घाबरून चौकशी करायला धांवत आले. शेजारी कुणाकडे तरी डुप्लिकेट चावी होती ती वापरून फ्लॅटचा दरवाजा उघडला तर सुहासिनी बेडरूममधे, खिडकीखाली बेशुद्ध अवस्थेमधे पडलेली आढळली! तेवढ्यांत शेजारी बेडवर तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी कुणीतरी वाचली आणि एकच हलकल्लोळ उडाला!" सगळी हकीकत नुसती ऐकतांना थरकांप उडालेल्या शुभदाने स्वत:ला सावरण्यासाठी बाजूच्या खुर्चीचा आधार घेतला! "नशीब बलवत्तर म्हणून सुहासिनी वाचली आहे, शुभदा! अगदी सुखरूप आहे!" म्हणत मनोरमाने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला! तेवढ्यांत दरवाजाचं लॅच उघडल्याचा आवाज आला! पोलीस चौकीतील काम निपटून मनोहर भोसले भाऊसाहेबांना सोबत घेऊन परतले होते. शुभदाला उद्देशून भोसले म्हणाले, "अनंतरावांशी माझं वाटेतच बोलणं झालं! ते आणि आणखी कांही मित्र १०-१५ मिनिटांत पोहोचतीलच!"
२२ जून २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४३
जेवणानंतर थोडा वेळ स्वस्थ डुलकी लागल्याने अनंतचं चित्त बऱ्यापैकी थाऱ्यावर आलं. त्याचा तणावमुक्त चेहरा बघून शुभदालाही हुरूप आला आणि त्याला 'गप्पांच्या बैठकीतील' मित्रांना भेटायला उशीर होऊं नये यासाठी ती रोजच्यापेक्षां लौकरच चहाच्या तयारीला लागली. चहा तयार झाल्यावर कप घेऊन ती डायनिंग टेबलापाशी आली तेव्हां अनंत मोबाईलवरून कुणाला तरी फोन करायचा प्रयत्न करीत होता. "भोसलेंना काॅल करताहांत कां?" शुभदाच्या प्रश्नावर होकारार्थी मान हलवीत अनंत म्हणाला, "हो;-- पण ते दुसऱ्या कुणाशी तरी बोलत असल्याने फोन लागत नाहींये!" "आधी चहा घ्या आणि मग पुन: प्रयत्न करा! नाहींतर चहा गार होईल!" "त्यांचा आतां चालुं असलेला काॅल संपला की बहुधा मनोहरपंतच फोन करतील" म्हणत अनंतने चहाचा कप उचलला. "भोसलेंशी बोलणं होईल तेव्हां त्यांना मनोरमा कुठे आहे ते विचाराल कां? मला वाटतंय् की ती नक्की भाऊसाहेबांच्या घरी असणार! तसं असेल तर मीसुद्धा तुमच्याबरोबर येईन म्हणते!" त्यावर अनंतने तिला 'आतां तूं तिथे येऊन काय करणार आहेस?' असं शब्दांत विचारलं नाहीं तरी तशा अर्थाचं प्रश्नचिन्ह त्याच्या नजरेत उमटलेलं शुभदाला जाणवलं. ती खुलासा करीत म्हणाली, "तुम्हांला कदाचित् आठवत नसेल, पण माझी चांगली ओळख आहे सप्रेवहिनींशी" "ती कशी काय?" अनंतच्या थंड स्वरांतला अविश्वास लपण्याजोगा नव्हता. "अहो, असं काय करताय्? या सप्रेवहिनी म्हणजे आपल्या बबलीच्या ८ वीच्या क्लासटीचर सुहासिनी सप्रे!" शुभदाने सांगितलेली ओळख ऐकून बुचकळ्यांत पडलेल्या अनंतने आपल्या स्मरणशक्तीला ताण देण्याचा प्रयत्न केला. 'बबलीची ८वीची क्लासटीचर म्हणजे जवळ��वळ २० वर्षांपूर्वीची गोष्ट?' असं स्वत:ला बजावीत तो विचार करूं लागला;-- आणि अचानक वीज चमकून सगळा काळोखा आसमंत उजळावा तशी एक आठवण त्याच्या मनांत जागी झाली! "म्हणजे जयूला आपण लाडानं घरी बबली म्हणायचो त्याचं नावीन्य वाटून कौतुक करणाऱ्या क्लासटीचर कां?"
शुभदाने हंसून मान डोलावली तशी चकीत होत आपल्या दोन्हीं हातांनी मस्तक गच्च दाबून धरीत अनंत उद्गारला, "मला ऐनवेळी त्यांचं नांव आठवलं नसलं तरी त्यांची हंसतमुख, सडपातळ मूर्ति माझ्या पक्की लक्षांत आहे! एवढी उत्साही, हंसतमुख बाई;--आणि आज आत्महत्येचा प्रयत्न?" "तुम्ही आधी शांत व्हा!" प्रचंड उत्तेजित झाल्याने बावचळलेल्या अनंतला समजावीत शुभदा म्हणाली, "तुम्हांला आठवताहेत त्या २० वर्षांपूर्वींच्या सप्रेवहिनी! पण आज त्यांची मानसिक अवस्था कशी आहे ते आपल्याला थोडंच माहीत आहे?" शुभदाच्या त्या शब्दांनी भानावर येऊन स्वतःला सावरीत अनंत म्हणाला, "तुझं म्हणणं अगदी योग्य आहे! २० वर्षांच्या काळांत एखाद्याच्या आयुष्यात मोठी उलथापालथ घडूं शकते! प्रत्यक्षांत काय घडलं असेल ते समजण्यासाठी आपल्याला आतां मनोहरपंतांशीच बोलायला हवं!" शुभदा कीचनमधे चहाची भांडी आणि कप धूत असतांनाच भोसलेंचा फोन आला. बोलणं संपल्यावर कीचनमधे येऊन अनंत म्हणाला, " शुभदा, तुझा अंदाज खरा ठरला! मनोरमाबाई भाऊसाहेबांच्या घरीच आहेत दुपारपासून! मनोहरपंतही तिथेच होते. पण थोड्या वेळापूर्वी जवळच्या पोलीस चौकीतून घडल्या प्रकाराची विचारपूस करायला फोन आला होता म्हणून आतां ते सगळं निस्तरायला पोलीस चौकीत जात आहेत !" शुभदा त्यावर कांही बोलण्यापूर्वीच तो पुढे म्हणाला, " तूं पटकन तयार हो, म्हणजे तुला भाऊसाहेबांच्या घरीं सोडून मी मित्रांना भेंटायला जाईन!" "नको;-- मी रिक्षाने जाईन! तुम्ही तुमच्या मित्रांना लौकर भेटा म्हणजे तुम्ही सगळेजण लौकर येऊं शकाल भाऊसाहेबांकडे."
भाऊसाहेबांच्या निवासस्थानीं शुभदा पोहोचली तेव्हां दारांत उभी राहून मनोरमा जणूं तिचीच वाट बघत होती. तिला आंत घेऊन मनोरमाने दरवाजा हलक्या हाताने लावून घेतला. शुभदाचा प्रश्नार्थक चेहरा लक्षांत घेऊन ती हळू आवाजात म्हणाली, "सुहासिनीला पूर्ण विश्रांती मिळावी यासाठी जरूर ती औषधं देऊन झोपवून ठेवलेलं आहे! गाढ झोपली आहे बिचारी;- पण तरीही आपण शक्यतों कमीत कमी आवाज करावा असा माझा प्रयत्न आहे!" "भाऊसाहेब बरे आहेत ना?" "हो;-- हळुहळू सावरताहेत!आतां ह्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनवर घडल्या प्रकारासंबंधी जबाब नोंदवायला गेले आहेत!" "समजलं!" अशा अर्थी मान हलवीत शुभदाने हातांतली पिशवी मनोरमाच्या स्वाधीन केली. निघण्यापूर्वी फोन करून तिने मनोरमाला 'कांही आणायचं आहे कां?' असं विचारल्यावर मनोरमाने मागवलेली कांही घर��ुती औषधे आणि किरकोळ चीजवस्तु त्यांत होत्या. "बरं झालं येण्यापूर्वी तुला फोन करून नक्की पत्ता विचारला! सप्रेमॅडम या फ्लॅटमधे रहायला आल्याचं मला माहीतच नव्हतं! आधीचा बंगला कधी आणि कशासाठी विकला?" "१० वर्षांपूर्वी थोरल्या गिरीशच्या लग्नाच्या वेळी जुना झालेला बंगला विकून हा, सर्व आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असा, ४ बेडरूमवाला नवीन फ्लॅट मोठ्या हौसेनं घेतला भाऊसाहेबांनी!" "सगळं छान चाललेलं असतांना मॅडमनी अचानक हा आततायीपणा कां केला?" "दिसतं तसं नसतं ग बाई! बरेच दिवस घरगुती धुसफूस चालुं असल्याचं ह्यांच्या कानांवर होतं! पण त्याचं पर्यवसान अशा प्रकारे होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं! बरीच मोठी कर्मकहाणी आहे;- बोलूं सावकाशीने!"
१५ जून २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४२
शुक्रवारी सकाळी अनंतची मित्रांबरोबर गप्पा आणि खाण्याची साप्ताहिक बैठक असल्याने शुभदा तशीही निवांत असे. आज जरा अधिकच निवांत होती कारण ४ दिवसांपूर्वी 'स्वयंसिद्ध अनाथाश्रमा'मधे घडलेल्या गैरप्रकारांबाबत विस्तृत कारवाई मनासारखी झाल्याच्या समाधानांत मनोहर भोसले आज सर्व मित्रांना विशेष पार्टी देणार होते! त्यांनी स्वत: फोन करून, "वहिनी, मी तुमच्यासाठी खास भलंमोठं पार्सल पाठवणार आहे;- तरी आज चूलीला पूर्ण विश्रांती देऊन मस्त आराम करायचा!" असा निरोप दिल्याने शुभदाला आज स्वयंपाकाचाही तगादा नव्हता! त्यामुळे बर्याच दिवसांनी मिळालेल्या फुरसतीचा सदुपयोग करुन एक नवीन डिझाईनचा स्वेटर विणायला सुरुवात करायचा घाट तिने घातला होता. संग्रही असलेल्या लोकरींचे गुंडे तपासून कुठले ३ रंग निवडावेत याचा विचार ती करीत असतांनाच डोअरबेल वाजली! अनंतला यायला आज नेहमींपेक्षा अधिकच उशीर होणार असल्याने 'कोण आलं असावं?' असा विचार करीत तिने दार उघडलं तर बाहेर अनंत उभा! "धांदलीमधे लॅचची चावी घरीच राहिली कां?" "तूं चुकून आंतून कडी लावली होतीस कां?" त्याला पाहून चकीत झालेल्या शुभदाच्या प्रश्नावर हातांतला चाव्यांचा जुडगा पुढे करीत अनंतने विचारलं, "मी नेहमीप्रमाणेच लॅच उघडायचा प्रयत्न केला, पण उघडलंच नाही!" "जाऊं द्या! माझीच कांहीतरी गडबड झाली असेल तुम्ही गेल्यावर दार ओढून घेतांना!" नेहमी हमखास लॅच उघडून घरांत येणाऱ्या अनंतला आज लॅच उघडतां आलं ��ाही म्हणजे तो नक्कीच कसल्यातरी गहन विचारांत मग्न असणार हे ओळखून शुभदाने विषय वाढवला नाहीं. आपला लोकरींचा पसारा झटपट आवरून तिने अनंतला सोफ्यावर बसायला जागा करून दिली आणि थंड पाण्याचा ग्लास त्याच्या हातांत देत सहज स्वरांत विचारलं, "पण तुम्ही आज एवढे लौकर कसे परत आलांत? भोसलेंची खास पार्टी होती ना?"
"हो, आज खास पार्टीचं आयोजन मनोहर भोसलेंनी केलं होतं! त्यांनी स्वत: प्रत्येकाला फोन करून आग्रह केल्याने कधी नव्हे ते आम्ही सर्व १६ मेंबर्स आज अगदी वेळेवर हजर होतो. मनोहरपंतांनी स्वत: ठरवलेल्या मेनूला दाद मिळाली. तसंच कांही जणांनी बदलही सुचवले . त्यानुसार खाद्यपदार्थांची ऑर्डर देण्यात आली आणि चहा-काॅफीचा आस्वाद घेत गप्पाही सुरु झाल्या! पण तेवढ्यांत एक फोन आला आणि एकच गोंधळ उडाला!" "म्हणजे?" "आमचे एक मेंबर भाऊसाहेब सप्रे रहात असलेल्या सोसायटीच्या अध्यक्षांचा फोन आला की सप्रेवहिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून भाऊसाहेबांनी तांतडीने घरीं परत यावं! ते ऐकून भाऊसाहेब एवढे घाबरले की त्यांनाच आधी डाॅक्टरांकडे न्यावं लागणार असं वाटायला लागलं! पण सुदैवाने त्यांच्या सोसायटीतच राहणारे यशवंत माने आमच्या ग्रुपमधे आहेत. त्यांनी भाऊसाहेबांना धीर देऊन सांवरलं आणि आपल्या कारमधे त्यांना बसवून तडक घरी घेऊन गेले!" "पण मग तुम्ही नाहीं गेलांत?" "शुभदा, आमची बर्याच वर्षांची ओळख असली आणि ग्रुपच्या निमित्ताने हल्ली नियमित भेटतही असलो तरी माझे भाऊसाहेबांशी वैयक्तिक संबंध नाहींत! त्यामुळे अशा नाजूक आणि अवघड परिस्थितीत माझ्यासारख्या, नाहीं म्हटलं तरी परक्या माणसाने त्यांच्या घरी जाणं मला योग्य वाटलं नाहीं! माझ्यासारखे इतरही ५-६ जण आहेत. आम्ही सर्वांनी एकत्र विचार करून ठरवलं की आपण आत्तां लगेच त्यांच्या घरी जायचं नाहीं!" यावर काय बोलावं हे न सुचून शुभदाही गप्प राहिली. पांच-सात मिनिटे अशा अवघडलेल्या शांततेत गेल्यावर अनंत विमनस्कपणे म्हणाला, "मात्र आम्ही सगळे संध्याकाळी एकत्र भेटून ठरवणार आहोत की कधी जायचं भाऊसाहेबांना भेटायला! तोपर्यंत एकुण परिस्थितीचाही अंदाज येईल!" "आतां भाऊसाहेबांसोबत कोण आहेत याची कांही कल्पना? म्हणजे त्यांना कांही मदत लागली तर या दृष्टीने मी विचारतेय!" "त्या सगळ्या गडबड गोंधळामधे यशवंत मानेंसोबत किती, कोण गेले आठवत नाहीं" अनंत विचार करीत उत्तरला,"पण मानेंसोबत गेले नसले तरी मनोहरपंत तिथे नक्की गेले असतील! त्यांची भाऊसाहेबांशी व्यक्तीशः मैत्री आहे. शिवाय एकुणच त्यांचं सोशल नेटवर्किंग मोठं आहे;- ज्याचा अशा वेळी हमखास उपयोग होतो! मीही संध्याकाळी त्यांनाच फोन करून परिस्थिती जाणून ��ेणार आहे!!"
बोलत असतांना अनंतच्या चेहर्यावरील तणाव व आवाजातील थकवा जाणवून शुभदा म्हणाली, "हो, संध्याकाळी तुम्ही ठरल्यानुसार तुमच्या मित्रांशी सल्ला-मसलत जरूर करा, पण तोपर्यंत मात्र विश्रांती घ्यायची! उन्हातून आला आहांत म्हणून थंडगार पन्हं घेणार आहांत की तुम्हांला तुमचा तिन्हीत्रिकाळ आवडता चहाच हवा?" "मला काय हवं ते ठाऊक असूनही कशाला नसतंं नाटक ग!" म्हणतांना अनंतच्या चेहर्यावर प्रथमच हलकीशी स्मितरेषा उमटली. 'बरं;-- चहा आणते!' म्हणत शुभदा कीचनमधे जाण्यासाठी वळली तेव्हां तिला थांबवीत अनंत म्हणाला, "तुझी जी कुणी मैत्रीण आहे डबा देणारी, तिच्याकडून सरळ जेवण मागव! आतां कांही करीत बसूं नकोस! आज सकाळी नाश्ता न केल्याने आतां या परिस्थितीतही आपल्या दोघांना लौकरच सणसणून भूक लागणार आहे!"
८ जून २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४१
मजेत कुल्फी खात असलेल्या शुभदाचा चेहरा अनंतच्या त्या प्रश्नाने कांहीसा झाकोळला. काहीही उत्तर न देतां ती गप्प बसून राहिली. त्यामुळे अस्वस्थ होऊन अनंत घाईघाईने म्हणाला, "शुभदा, मी कालपासून बघतो आहे की वरकरणी सर्व कांही सुरळीत चालूं असलं तरी मधुनच अचानक तूं आतां हरवल्यागत बसून होतीस तशी हरवून जातेस! नकोशा वाटणाऱ्या आठवणींमधे असं गुंतून पडून कसं चालेल? त्यांतून तुला प्रयत्नपूर्वक बाहेर पडायलाच हवं!" "मलाही ते कळतंय पण वळत नाहीं, त्याला काय करूं?" शुभदाचा केविलवाण्या स्वरांतला तो प्रश्न ऐकून अनंतला तिच्या मनांत चाललेल्या प्रचंड घालमेलीची कल्पना आली. त्याने आपली खुर्ची शुुभदाच्या अधिक जवळ ओढून घेतली आणि तिचे डबडबलेले डोळे हलक्या हाताने पुसत तो मृदु स्वरांत म्हणाला, "शुभदा, तुला ठाऊक आहे की कालपासून अनाथाश्रमांतल्या त्या अश्राप मुलांसाठी आपण दो��ांनीच नव्हे, तर आपल्या मित्रपरिवारानेही जे शक्य होतं ते सगळं केलं आहे;-- आणि यापुढेही जमेल तसं करीत राहणार आहोंत! पण झाल्या घटनांपासून आपण थोडं अलिप्त नाहीं झालो, तर साधक-बाधक विचार करून पुढे काय करायला हवं ते कोण आणि कसं ठरवणार?" "तुमचं म्हणणं खरं आहे;-- पण काल बघितलेले अनाथाश्रमांतल्या त्या मुलांचे भुकेले चेहरे डोळ्यांसमोरून जातच नाहीत! राहून राहून मनांत येतं की तिथे काम करणाऱ्या त्या तिन्ही परिचारिकांना त्या कोवळ्या, अनाथ मुलांबद्दल कांहीच माया वा म��ता कशी वाटली नाही? त्या पगारी नोकर असल्या तरी त्यांनाही घरी मुलं-बाळं असतील ना?" "त्या तिघी ज्या प्रकारे वागल्या ते समर्थनीय नाहीच;-- पण त्या कशा परिस्थितीत तिथे काम करीत होत्या ते आपल्याला ठाऊक नाही! कदाचित रोजच तेच ते बघून त्यांची मनं निर्ढावली असतील! बघूंया पोलिस चौकशीत आणि वैद्यसाहेब स्वत: करीत असलेल्या तपासांत काय निष्पन्न होतं ते!"
तेवढ्यांत अनंतचा मोबाईल वाजला. त्यानं पाहिलं तर मनोहर भोसलेंचा काॅल होता. त्याने तो घेतल्यावर भोसले म्हणाले, "वहिनी जवळच असतील तर फोन स्पीकरवर ठेवा, म्हणजे त्यांनाही आपलं बोलणं ऐकतां येईल!" "हो, ती इथेच आहे!" शुभदाला खुणेनं जवळ बोलावून घेत अनंतने स्पीकर ऑन केला आणि म्हणाला,"बोला आतां, मनोहरपंत!" "अनंतराव, मनोरमाशी झालेल्या सविस्तर बोलण्यानुसार मी आज सकाळच्या मिटींगपूर्वी एक मेल वैद्यसाहेबांना पाठवली होती! ती वाचल्यावर आत्तां थोड्या वेळापूर्वी त्यांचा फोन आला होता की त्यांना मनोरमा, शुभदा आणि रजनी या तिघींनाही प्रत्यक्ष भेंटायचं आहे! मी मेलमधे मांडलेल्या अनेक मुद्यांचे तपशील या तिघींशी बोलल्याशिवाय नीट समजणार नाहींत असं त्यांना वाटतं! तर त्यांची भेंट कधी होऊं शकेल?" "मनोहरपंत, मी सबनीस पति-पत्नींशी बोलून तुम्हांला १० \ १५ मिनिटांत फोन करतो. प्रमिला व प्रभाकररावांनाही कळवायचं आहे कां?" "आपली वेळ ठरली की मी स्वतः फोन करुन त्यांना मिटिंगमधे सहभागी होण्याची विनंती करीन!" मनोहर भोसलेंचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असतांना शुभदाच्या चेहर्यावरील झाकोळ कमी होत असल्याचं लक्षांत येऊन अनंतला हायसं वाटलं! 'बहुधा खुद्द वैद्यसाहेबांशी प्रत्यक्ष बोलण्याची संधी मिळणार या विचाराने शुभदाच्या मनांत साचलेलं नैराश्य ओसरलं असावं' असा कयास बांधीत त्याने शुभदाला विचारलं, "तर मग कधी भेटायचं वैद्यसाहेबांना?" "आधी सबनीसांशी बोलून त्या दोघांना कुठली वेळ सोयीची आहे ते बघा!" शुभदा उत्साहाने म्हणाली, "भोसले स्वत: पमाताई आणि प्रभाकररावांना फोन करणार असले तरी आपण त्यांना आधीच फोन करून त्यांचीही सोय बघायला हवी! तुम्ही सबनीसांशी बोलताहांत तोपर्यंत मी पमाताईंना फोन करूं कां?"
सर्वानुमते दुसऱ्या दिवशी सकाळी १० च्या सुमारास वैद्यसाहेबांना भेंटायचं ठरल्यावर अनंतने फोन करून तसं भोसलेंना कळवलं! तोपर्यंत शुभदाने रात्रीच्या जेवणाची तयारी केली. जेवायला सुरुवात केल्यावर शुभदा कांहीशी घुटमळत म्हणाली, "आता तसा उशीर झालाय् खरा;--पण एक सुचवूं कां?" तिच्या मनांत जे कांही घोळत आहे, ते लौकर बाहेर यावं यासाठी तिला उत्तेजन देत अनंत म्हणाला, "कुठल्याही चा��गल्या गोष्टीला वेळकाळाची मर्यादा नसते! तेव्हां तुझ्या मनांत काय आहे ते मोकळेपणाने सांग! त्यातून कांहीतरी चांगलंच निष्पन्न होईल अशी माझी खात्री आहे!" "वैद्यसाहेबांना भोसलेंनी पाठवलेली मेल तुमच्या काॅम्प्युटरवर मागवून घ्याल कां? ती वाचून मला, रजनीला व मनोरमाला अनाथाश्रमांत खटकलेल्या सर्व बाबींचा समावेश त्यामधे झाला आहे की नाहीं ते तपासतां येईल!" "अगदी योग्य सुचना केलीस, शुभदा!" मनापासून कौतुक करीत अनंत म्हणाला, "मी मनोहरपंतांना लगेचच कळवतो! म्हणजे बहुधा झोपण्यापूर्वी तुला ती मेेल तपासून बघतां येईल!"
१ जून २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४०
'स्वयंसिद्ध अनाथाश्रम' चालविणाऱ्या ट्रस्टींची तांतडीने बोलावलेली बैठक अपेक्षेप्रमाणे वादळी झाली. ट्रस्टच्या अध्यक्षांनी घडलेल्या घटनाक्रमाला वर्तमानपत्रांत प्रसिद्धी मिळूं नये याची शिताफीने काळजी घेतली असली तरी दबत्या आवाजांत चर्चा सुरु होती. त्यामुळे ट्रस्टशी संबधित बहुसंख्य सभासद बैठकीला आवर्जून उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी अध्यक्ष विश्वनाथ वैद्य यांनी आदल्या दिवशी घडलेल्या दुर्दैवी घटनाक्रमाबद्दल माहिती देत दिलगिरी व्यक्त करुन चर्चेला सुरुवात केली. तिघीं परिचारिकांविरुद्ध झालेल्या पोलीसी कारवाईचा निषेध करण्यासारखं कांहीच नसल्याने, दैनंदिन कारभार सांभाळणाऱ्या ट्रस्टींना इतर ट्रस्टींनी केलेल्या प्रश्नांच्या भडीमाराला पटतील अशी उत्तरं देणं कठीण झालं होतं! विशेषत: मनोहर भोसलेसारख्या ट्रस्टच्या हितचिंतकाने विचारलेले प्रश्न संबंधितांना घायाळ करणारे होते! वातावरणातला तणाव वाढत जातांना पाहून, आपल्या अधिकारामधे कामकाजांत हस्तक्षेप करीत अध्यक्ष विश्वनाथ वैद्य यांनी बैठक बरखास्त झाल्याचं जाहीर करीत समारोप केला, "चर्चेदरम्यान उपस्थित झालेल्या अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं ताबडतोब मिळणं शक्य नाहीं हे उघडच आहे! पण ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना आश्वासन देतो की घडल्या प्रकाराचा सखोल तपास करून, आजपासून बरोबर सात दिवसांनी याच वेळी, इथेच आयोजित केलेल्या बैठकीत संपूर्ण अहवाल सादर केला जाईल! त्यामधे आपल्या 'स्वयंसिद्ध अनाथाश्रमा'चं नांव कलंकित करणारे असे प्रकार पुन: घडूं नयेत यासाठी नियोजित उपायांचाही समावेश असेल!"
बैठकीच्या समारोपानंतर थोड्याच वेळांत जमलेल्या संबंधितांची गर्दी कांहीशा अस्वस्थ शांततेमधेच पांगली. बैठकी��ूर्वी अध्यक्षांनी केलेल्या विनंतीनुसार मनोहर भोसले आपल्या सहकाऱ्यांसह त्यांची वाट पहात थांबले होते त्या खोलीत येऊन अध्यक्ष विश्वनाथ वैद्य यांनी भोसलेंचे दोन्ही हात आपल्या हातांत घेऊन प्रेमभराने दाबले आणि भारावलेल्या स्वरांत ते म्हणाले, "मनोहरपंत, तुम्ही विचारलेल्या टोकदार प्रश्नांनी नियामक मंडळाच्या सदस्यांची उडालेली भंबेरी पुरेशी बोलकी आहे! त्यांच्या अब्रूची लक्तरे चव्हाट्यावर येऊं ��येत म्हणूनच मी बैठक ताबडतोब स्थगित करण्याचा निर्णय घेतला!" अनंत आणि इतरांकडे वळून ते पुढे म्हणाले, "तुम्ही सर्वांनी मनोहरपंतांना ऐनवेळी साथ देऊन अनाथाश्रमाचा कारभार कालपासून सांभाळला त्याचं मोल शब्दांनी करण्यासारखं नाहीं. तथापि तुम्हां सर्वांना अधिक त्रास होऊं नये यासाठी मी अन्य कांही हितचिंतकांच्या मदतीने स्त्री-पुरुष स्वयंसेवकांची व्यवस्था केली आहे! काम समजावून दिल्यावर ते सगळी जबाबदारी अंगावर घेतील!" "वैद्यसाहेब, तुमची बैठक सुरु असतानाच आज काम करणाऱ्या स्वयंसेवकांची टीम आम्हांला आंत येऊन भेटली!" अनंत पुढे होत नमस्कार करून म्हणाला, "त्यांना काम समजावण्याला सुरवात झाली आहे! सगळी घडी सुरळीत बसेपर्यंत आमच्यापैकी एक-दोघं ऐनवेळी लागेल त्या मदतीसाठी इथे दिवसभर आळी-पाळीने हजर असतील! तुमच्या मागे कामांचा मोठा व्याप आहे;-- तरी तुम्ही इथली काळजी अजिबात करूं नका!" त्याला दुजोरा देत भोसले म्हणाले, "वैद्यसाहेब, स्वयंसेवकांची टीम दाखल झाली आहे. त्यामुळे आतां इथल्या कारभाराची काळजी सोडा आणि झाल्या घटनांच्या सखोल तपासाचा पाठपुरावा करा! कारण त्याच्या तपशीलावर माझ्याप्रमाणे इतर अनेकांचीही नजर असणार आहे!"
जवळजवळ २४ तासांच्या तणावानंतर फुरसतीचा मोकळा वेळ मिळाला तेव्हां शुभदाला घरांतली खोळंबलेली कामं आठवली. चहा झाल्यानंतर 'दमायला झालंय्' या सबबीखाली ती अनंत बरोबर रोजच्यासारखी फिरायला गेली नाही! अनंत एकटाच बाहेर पडल्यावर लगेच तिने फ्रिजमधून मेथीची जुडी बाहेर काढली आणि डायनिंग टेबलापाशी बसून निवडायला सुरुवात केली! हात आणि डोळे यांत्रिकपणे मेथीची पानं पारखून निवडत असले तरी तिच्या मनांत मात्र अनाथाश्रमातील आठवणींनी फेर धरला होता! त्यामधे ती एवढी गुंगून गेली की तासाभराने अनंत बंद दाराचं लॅच उघडून घरांत आल्याचं तिला समजलंही नाहीं. अनंतने तिची हरवल्यागत झालेली अवस्था उमजून कसलाही आवाज न करतां कीचनमधे येत हलक्या हाताने दोन छोट्या प्लेट डायनिंग टेबलवर मांडल्या आणि ट्यूूबलाइट लावली. त्यासरशी शुभदा एकदम भानावर आली आणि आपल्याकडे बघत, मिस्कील हंसत उभ्या ��सलेल्या अनंतकडे डोळे मोठे करुन पहात म्हणाली, "असे काय चोरासारखे घरांत शिरलात आवाज न करतां? आणि या दोन प्लेट कशासाठी मांडल्या आहेत?" "बायको दमली आहे, म्हणून तिच्या श्रमपरिहारासाठी बदाम-पिस्ता कुल्फी आणली आहे!" तिच्यासमोर खुर्ची ओढून घेऊन बसत अनंतने हातातलं पार्सल उघडलं आणि कुल्फी बाहेर काढीत विचारलं, "एक पुरेल? की माझीसुद्धां देऊं?" "काय वात्रटपणा हा! जसे कांही हो म्हटलं तर तुमची कुल्फीसुद्धां देणारच आहांत!!" शुभदा कृतक् कोपाने म्हणाली, "एवढी दानत होती, तर माझ्यासाठी दोन कां नाहीं आणल्या?" "नाहीं बुवा सुचलं आपल्याला!" कानाच्या पाळ्या पकडल्याचा नाटकी आविर्भाव करीत अनंत म्हणाला, "त्यासाठी बंद्याला माफी असावी!" त्यावर हंसत शुभदा कुल्फी खाऊं लागल्याचं पाहून अनंतने विचारलं, "शुभदा, खरं सांग! शरीराने घरी आली असलीस तरी मनाने तूं अजूनही अनाथाश्रमांतच रेंगाळते आहेस कां?"
२५ मे २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ३९
"तुम्ही तिघीजणी पुढील १५ मिनिटांत इथून निघाला नाहीत ना, तर मी खरंच खुप रागावेन!" पमाताईच्या शांत स्वरांतला निग्रह शुभदाला चांगलाच जाणवला. तणाव कमी करण्यासाठी ती हंसत हंसत म्हणाली, "उगाच किती चिडचिड कराल, पमाताई! आम्ही निघायचीच तयारी करीत आहोंत हे तुम्हीसुद्धां बघताय् ना!" "हो, बघतेय् ना!-- आणि अर्ध्या तासापासून तेंच ते पालुपदही ऐकतेय्!" पमाताई मनोरमा आणि रजनीकडे कटाक्ष टाकीत म्हणाली. "तसं नाहीं,पमाताई!" मनोरमा समजूत काढीत म्हणाली, "पण आम्ही गेल्यावर रात्रभर तुम्ही एकट्याच इथे असाल;-- त्यामुळे कांही करायचं राहूं नये याची जरा अधिकच खबरदारी घेत आहोंत एवढंच!" "पण राहिलंय् काय? पोटं भरल्यावर सगळी मुलं केव्हांची झोपीं गेली आहेत! भांडी घासून उरल्या-सुरल्याची झाकपाकही तुम्ही केली आहे." आपल्या प्रतिपादनाला चिकटून रहात पमाताईने शांतपणे विचारलं, "मग आतां संध्याकाळपासून इथे खपत असलेल्या तुम्हांला घरी जाऊन थोडी विश्रांती घ्यावी असं वाटत नाहीं कां?" "चला ग, आतां निघुयां! उद्यां सकाळी वेळेवर यायचं आहे ना, पमाताईंना मोकळं करायला? नाहींतर, सकाळी उशीर कराल आणि मग पमाताईंना तोंड देणं मुष्कील होईल!" रजनीने सगळ्या विषयावर पडदा टाकायचा प्रयत्न केला. स्वयंपाकघरात नाईट-लॅम्प लावून ठेवून सगळ्याजणी बाहेर आल्या तेव्हां जण��ं त्यांचीच वाट बघत असल्यागत मनोहर भोसले म्हणाले, "तुम्हांला बोलावण्यासाठी आतां मी आंतच येणार होतो! प्रभाकरराव आणि पमाताई, तुम्ही रात्रभर इथे थांबणार असल्याने मोठीच काळजी मिटली आहे! सकाळी आमच्यापैकी कुणीतरी येईलच ७\७-३० पर्यंत. मध्यंतरी कांही लागलं तर वाॅचमनला सांगा किंवा आमच्यापैकी कुणालाही फोन करा!"
अनाथाश्रमाच्या इमारतीबाहेर आवारांत उभ्या केलेल्या आपापल्या वाहनांकडे सर्व वळण्यापूर्वी मनोहर भोसले सर्वांना उद्देशून म्हणाले, "आपण सर्व इथे आपुलकीने काम करतो, त्यामुळे कुणीही कुणाला धन्यवाद देण्याची आवश्यकता नाहीं! आज दुपारपासून अचानक अंगावर पडलेली जबाबदारी आपण समर्थपणे निभावून नेली;-- तथापि उद्यांपासून तांतडीने पर्यायी व्यवस्था करण्याबद्दल मी ट्रस्टच्या अध्यक्षांना, संध्याकाळी ते एकुण परिस्थिती पहायला आले होते तेव्हां स्पष्टपणे सांगीतलं आहे. त्यांनी त्यासाठी उद्यां सकाळी सर्व संबंधितांची बैठक तांतडीने बोलावली आहे. त्या बैठकीत पर्यायी व्यवस्थेचा निर्णय होईल!" "पण पर्यायी व्यवस्था म्हणजे काय?" शुभदाने कांहीसं अस्वस्थ होऊन विचारलं, "आतां होत्या तशाच दुसऱ्या आया वा परिचारिका नेमणार?" तिला थांबवायचा अनंतने प्रयत्न केला तेव्हां भोसले म्हणाले, "अनंतराव, वहिनींनी उपस्थित केलेल्या प्रश्नामधे तथ्य आहे! मी स्वत: गेली १२ वर्षं या 'स्वयंसिद्ध अनाथाश्रमा'साठी देणग्या गोळा करीत असलो तरी ट्रस्टच्या अंतर्गत कारभाराशी माझा कांहीच संबंध नव्हता! त्यामुळेच आज जे घडलं ते मलाही खुप धक्कादायक आहे! क्षणभर वाटलं की आपण इतकी वर्षं ट्रस्टच्या एकुण कारभारातही थोडं तरी लक्ष घालायला हवं होतं!" "जे घडलं ते तुमच्याप्रमाणेच, ट्रस्टशी संबधित इतर सर्वांनाही धक्कादायक असेल ना?" अनंतने सावधपणे विचारलं.
"नक्की सांगणं कठीण आहे!" भोसले घुटमळत म्हणाले, "जे काय असेल ते असो;-- पण मी मात्र उद्यां होणाऱ्या बैठकीत याबद्दल अनेक प्रश्न बेधडक विचारणार आहे! ट्रस्टच्या दैनंदिन कारभाराशी संबंधित नसलो, तरी माझ्यावर विश्वास ठेवून देणग्या देणाऱ्यांच्या वतीने रोखठोक प्रश्न विचारण्याचा पुरेपूर अधिकार मला आहे हे समजून अध्यक्षांनी मला उद्यां होणाऱ्या सभेमधे भाग घेण्यासाठी खास आमंत्रित म्हणून बोलावलं आहे!" "ते तुमच्या सभेमधे काय होईल, मला कांही कळत नाहीं! पण आम्ही तिघींनी आज जी अव्यवस्था सगळीकडे बघितली त्यावरून एवढं नक्की वाटतं की यापुढे तरी सुशिक्षित आणि अनुभवी परिचारिकांची नियुक्ती करावी लागेल!" मनोरमाने व्यथित स्वरांत सुचना केली. "ज्या कुणा नवीन परिचारिकांची निवड होईल त्यांना ट्रस्टने पुरेसा पगार दिला पाहिजे, म्हणजे त्यांना अशी चोरी-मारीची दुर्बुद्धी होणार नाहीं!" रजनीने आपलं मत मांडलं. "या अनाथाश्रमांतल्या बऱ्याच अपंग, आज��री मुलांना धड तक्रारही करतां येत नाही!" शुभदा हळहळत म्हणाली, "पण ज्या कांही चार-सहा मुलांशी आमचा संवाद होऊ शकला, त्यावरून असं जाणवलं की इथे काम करणाऱ्या परिचारिका इथल्या मुलांना व्यवस्थित खाऊं-पिऊं घालण्यापेक्षा स्वत:च्या छानछोकीमधेच दंग होत्या!" "तुम्ही तिघींनी जे कांही अनुभवलं त्याचा सविस्तर गोषवारा मनोरमा मला आतां घरी गेल्यावर सांंगेलच! त्या आधारे मी उद्यां होणाऱ्या ट्रस्टींच्या बैठकीत काय मुद्दे उपस्थित करायचे त्याची यादी तयार करीन!" भोसले म्हणाले, "त्याबाबत आपण उद्यां सकाळी बैठकीपूर्वी, एकत्र जमून बोलुयां!"
१८ मे २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ३८
भिंतीवरील घड्याळात पाच टोले पडले ते ऐकून 'अगबाई, पाच वाजले वाटतं! आपला किती वेळ उगाचच मोबाईल बघण्यात गेला!' या विचारानं शुभदा एकदम भानावर आली. दुपारचा चहा झाल्यावर अनंत शिरस्त्याप्रमाणे 'ठरलेला वार' म्हणून 'स्वयंसिद्ध' अनाथाश्रमाच्या हिशोब तपासणीच्या कामासाठी गेला होता तेव्हांपासून ती मोबाईलच्या मोहजालातच रमली होती. चहाचे कप आणि भांडी धुवायची राहिली आहेत हे लक्षांत येऊन शुभदाने मोबाईल चार्जिंगसाठी लावला आणि ती कीचनकडे वळली. सिंकमधे चहाचे कप आणि भांडी ठेवून ती नळ सोडणार एवढ्यांत मोबाईल वाजला. पाहते तर अनंतचा काॅल होता. 'स्वयंसिद्ध' मधे गेल्यावर अनंत क्वचितच फोन करीत असे. त्यामुळे काॅल घेत तिने कुतूहलाने विचारलं, "अनाथाश्रमांत पोहोंचल्या पोहोंचल्या काय काम काढलंत माझ्याकडे?" "शुभा, तूं आतां घरीच आहेस कां?" "हो;-- पण असं कां विचारताय्?" अनंतच्या आवाजातला तणाव जाणवून शुभदाचीही घालमेल वाढली. "एका महत्वाच्या कामासाठी तुला शक्यतो लौकर 'स्वयंसिद्ध'मधे यावं लागणार आहे! काय काम आहे ते इथे आल्यावर सांगतो, पण काळजी करण्यासारखं काही नाही!" "ठीक आहे, मी ५ \ १० मिनिटांत निघतेच!" "सोबत रजनीवहिनींनाही घेऊन येणं जमेल कां? हवं तर मी दिनकररावांना फोन करून सांगून ठेवतो!" "अहो, नको! मोकळी असेल तर रजनी लगेच येईल माझ्याबरोबर! त्यासाठी सबनीसांच्या परवानगीची ती वाट बघणार नाहीं!"
रस्त्यावर आल्यावर रिक्षा लगेच मिळाली तरी ऐन रहदारीची वेळ असल्याने शुभदा आणि रजनीला 'स्वयंसिद्ध' अनाथाश्रमात पोहोचायला तासभर लागला. 'तसंच कांही कारण असल्याशिवाय अनंत आपल्याला तांतडीने बोलावून घेणार नाहीं!' याची खात्री असली तरी 'नक्की काय झालं असावं?' याबाबत मनांत शंका-कुशंकांचं काहुर माजल्याने वाटेत दोघींमधे फारसं संभाषण ��ालं नाहीं! उगीच काहीतरी फुटकळ विषय काढून ताण कमी करण्याचे प्रयत्नही यशस्वी झाले नाहींत! अशा अबोल वातावरणात रिक्षा अनाथाश्रमापाशी पोहोंचली तेव्हां जणूं त्यांची वाट बघत तिथे थांबलेला अनंत चटकन् पुढे झाला. मीटर पाहून त्याने रिक्षावाल्याला पैसे दिले आणि समोरच्या दिशेला अंगुलीनिर्देश करीत तो म्हणाला, "अजून ऊन खुप आहे;-- त्यामुळे तहान तहान होते आहे! आंत जाण्यापूर्वी समोर ऊसाचं गुऱ्हाळ आहे तिथे रस पिऊंयां कां? म्हणजे आपल्याला थोडं बोलतांही येईल!" गिऱ्हाईकांसाठी गुऱ्हाळाशेजारी मांडलेल्या खुर्च्यांवर इतरांसमवेत बसण्याऐवजी जवळच असलेल्या एका डेरेदार झाडाच्या सावलीत उभे राहून बोलुयां असं अनंतने सुचवलं. त्याप्रमाणे उभा राहून ऊसाच्या रसाचे घोट घेत अनंत सांगूं लागला, "तुम्हां दोघींना तांतडीने इथे बोलावून घेण्याचं कारण म्हणजे या अनाथाश्रमाची व्यवस्था सांभाळणा-या तिन्ही परिचारिका वा आयांना आज सकाळपासून पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतलं आहे. कारण त्या तिघींविरुद्ध चोरी आणि अफरातफरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे! त्यामुळे सकाळपासून अनाथाश्रमांत मुलांची काळजी घेण्यासाठी कुणीही नसल्याने एकच गोंधळ उडाला आहे! आपल्या मनोहर भोसलेंना याबाबत कळल्यावर ते लगेच सपत्नीक आले! मी येथे आल्यावर सर्व परिस्थिती बघितली आणि वाटलं की भोसलेवहिनींना कुणाची तरी मदत लागेल म्हणून!--- आणि तुम्ही दोघीजणी नजरेसमोर आलांत!"
"तरी आपल्याला कळायलाच उशीर झाला!" शुभदा हळहळत म्हणाली, "रजनी, आपण सरळ आश्रमाच्या कीचनमधेच जाऊंयां! मनोरमा नक्की तिथेच असेल. बिचारी एकटी कशाकशाला तोंड देत असेल या कल्पनेनेच अंगावर कांटा येतोय्!" "मनोरमा कोण?" "मनोरमा म्हणजे मनोहर भोसलेंची बायको!" अनंतच्या प्रश्नावर शुभदा खुलासा करीत म्हणाली, "आमची इथेच ओळख झाली. तीही वरचेवर येत असते आश्रमाला कांही ना कांही स्वरुपात मदत करण्यासाठी!" "मनोरमावहिनी म्हणजे मूर्तिमंत मायाच!" रजनी कौतुकाने उद्गारली, "त्यांना इथल्या अनाथ, अपंग मुलांबद्दल इतकी आस्था आहे ना, की दरवेळी स्वतः कांहीतरी बनवून आणतात आणि सर्वांंना मायेने खाऊं घालतात!" बोलत बोलत तिघे आश्रमांत शिरले आणि समोरच त्यांना मनोहर भोसले भेटले. शुभदा आणि रजनीला पाहून त्यांचा चेहरा उजळला आणि ते उत्साहाने म्हणाले, "मी आतांच मनोरमाला सांगत होतो की बराच वेळ झाला, अनंतराव कुठे दिसत नाहींत;-- म्हणजे बहुधा ते शुभदावहिनींची कुमक मागवायच्या खटपटींत असणार! जोडीला रजनीवहिनी;-- म्हणजे सोनेपे सुहागा!" "पण आहे कुठं मनोरमा? तिला कीचनमधेच मदतीची गरज असेल ना?" शुभदाने विचारलं. "हो;-- भुकेल्या बाळगोपाळा��च्या पंगतीची तयारी करीत आहे! तुम्ही दोघी कशा वेळेवर धांवून आला आहांत! तुम्हांला बघूनच मनोरमाला दहाजणींचं बळ येईल!"
११ मे २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ३७
" केदार, गेले ४ दिवस तुझी आई तुमच्या स्टाॅलवर येऊं लागल्याचा मोठा बदल तर आम्ही बघत आहोंतच" गरम चहाचा घोट घेत अनंतने विषयाला हात घातला,"पण त्यामुळे कांही फरक पडल्याचं तुला वा एकनाथला जाणवतंय कां?" "आईवर सध्यां फक्त काऊंटरपाशी बसून येणारं गिऱ्हाईक जी काय ऑर्डर देईल ती आम्हांला आंतमधे मोठ्याने सांगायचं काम सोंपवलेलं आहे!" विचार करीत केदार सांगू लागला, "त्यामुळे प्रथमदर्शनी आईला काऊंटरवर बघून येणारं गिऱ्हाईक कांहीसं चपापतंच. हातांत कांही विडी-सिगारेट असेल तर लांब ठेवून आक्का, मामी वा मावशी म्हणत जरा अदबीनं बोलूं लागतं!" "नाहींतर आम्ही असूं काउंटरवर, तेव्हां चक्क आमच्या तोंडावर मजेनं धूर सोडत गिर्हाईक ऑर्डर द्यायचं" एकनाथ म्हणाला. समाधानाने हंसत सबनीसांना उद्देशून अनंत म्हणाला, "दिनकरराव, मी तुम्हांला म्हटलं होतं ना, की आपल्या समाजांत कुठल्याही स्तरावर असो, पण आजही वडीलधा-या बाया-बापड्यांचा आब राखण्याची पद्धत आहे!" "माझी आई तशी अबोल आहे. पुरुष मंडळींमधे पटकन बोलण्याची तिला सवय नाहीं. पण आईच्या नजरेनं ती गिऱ्हाईकाच्या चेहर्यावरील भूक ओळखते आणि मग कांहीतरी खायला घेण्याचा आग्रह करते!" केदार कौतुकानं सांगू लागला, "परवां तर तिने कामावर निघालेल्या दोघांकडे पैसे नसल्याचं अचूक ताडलं आणि "आतां आधी खाऊन घ्या, पैसे मागाहून द्या" असं म्हणत त्यांना २ प्लेट कांदेपोहे खायला घातले!" "आम्ही आजवर कुणाला उधारी दिली नव्हती, पण मावशीने त्या दिवशी आपणहून दिली!" एकनाथ म्हणाला,"गंमत म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळीं त्या दोघांनी उधारीचे पैसे तर आणून दिलेच, पण पोह्यांची वाखाणणी करीत ४ प्लेट पोहे सोबत पार्सल म्हणून नेले!" "पण त्यांनी उधारीची परतफेड केलीच नसती तर?" सबनीसांनी कुतूहलाने विचारलं. एवढा वेळ शांतपणे सगळं ऐकणारी केदारची आई म्हणाली, "काका, ते दोघे चेहर्यावरून लबाड वाटत नव्हते! तसंही रोज जिथं २५-३० प्लेटा खपतात, तिथं दोन प्लेटांचे पैसे नसते आले तरी काय फरक नसता पडला! माझ्या हातून दोन प्लेटा चुकून सांडल्या आणि पोहे धरणीमातेला मिळाले असं धरून चालले असते मी!" त्यावर समाधानाने हंसत अनंत उद्गारला, "केदार आणि एकनाथ, ही आपुलकी आणि माया आईच्या मुखातूनच येते बाबांनो! मावशींच्या अशा लाघवी आपुलकीचा तुमच्या स्टाॅलवर येणाऱ्या गिऱ्हाईकांवर कळत-नकळत काय प्रभाव पडतो, ते तुम्हांला लौकरच समजेल!"
"त्याबद्दल आपण योग्य वेळीं बोलूंच;- पण तूर्तास 'केदारनाथ स्टाॅल'वर येणाऱ्या स्त्री ग्राहकांना विशेष सोयी काय उपलब्ध होतील हे मला अजून तरी समजलेलं नाहीं!" म्हणत सबनीस पुन: एकवार मुख्य विषयाकडे वळले. "काका, ते आतांच चव्हाट्यावर मांडलं तर रामनवमीला आमच्या काकु कशाचं उदघाटन करणार?" केदार कांहीसं चिडवीत म्हणाला, "आई, तूं जरा बाहेर येणाऱ्या गिऱ्हाईकांवर लक्ष ठेव! तोवर मी आणि एकनाथ काकांना आंतमधे नेऊन आमची योजना समजावतो!" अनंत आणि सबनीसांना घेऊन केदार आणि एकनाथ स्टाॅलच्या मागच्या बाजूला आले. त्या भागाची शक्य ती साफसफाई करुन आवश्यक तिथे रंगरंगोटीही केल्याचं जाणवत होतं! "सध्यां आहे त्या जागेत भागवावं लागणार आहे म्हणून इथे महिला ग्राहकांसाठी सुरवातीला २ राखीव खुर्च्या ठेवणार आहोत!" केदार सांगत असतांना एकनाथने झाकून ठेवलेल्या २ खुर्च्यांवरचं आवरण बाजूला केलं! खुर्च्या नवीन नसल्या तरी पाॅलिश केल्यामुळे तुकतुकीत दिसत होत्या! दोन्हींवर रेखीव अक्षरांत 'महिलांसाठी राखीव' असं लिहिलेलं नजरेत भरत होतं! "गर्दी वाढली तर इथेच आणखी २ खुर्च्या मांडण्यासाठी थोडी जागा द्यायचं शेजारच्या स्टाॅलवाल्याने कबूल केलं आहे! त्यासाठी त्याला रोज थोडी रोख रक्कम द्यायचं ठरलं आहे!" तेवढ्यांत अनंतची प्रश्नार्थक नजर स्टाॅलच्या मागील बाजूस एका कोपऱ्यात दाटीवाटीने उभ्या केलेल्या छोट्या वाॅश बेसिन आणि आरशाकडे वळलेली बघून एकनाथने घाईघाईने खुलासा केला, "काका, हे माझ्या बायकोने सुचवलं! ती म्हणाली आम्हां बायकांना कुठेही गेलं की आधी आपण नीट वा ठीकठाक आहोत ना ते बघण्याचा मोठा सोस असतो. त्यामुळे तुम्ही स्त्री-ग्राहकांची सोय कराल, तिथं छोटंसं वाॅश बेसिन आणि आरसा यांची सोय जरूर करा, म्हणजे बायकांना निदान आरशात डोकावून बघतां येईल, हवं तर चटकन् तोंडावर पाण्याचा हात फिरवतां येईल!" "बघ, तुझ्या बायकोचं डोकंही कसं तेज चालतंय स्त्री-ग्राहकांना नवीन सुखसोयी पुरवण्याबाबत!!" कौतुकाने तारीफ करीत अनंत म्हणाला. "काका, आपले चहा-काॅफीचे वा सगळ्या खाद्यपदार्थांचे दर वाजवी असल्याने त्यामधे स्त्री ग्राहकांना विशेष सूट देण्याचा सध्यां तरी विचार नाही! त्यामुळे बिलं करणंही सोपं आणि एकमार्गी होईल!" केदारने आणखी एक मुद्दा निकाली काढला, "त्यांतून��ी मोठा ग्रुप आला वा पार्सलची मोठी ऑर्डर मिळाली तर बघूं!" "केदार, या सगळ्या गडबडीत काकांना स्टाॅलचा मुख्य बोर्ड दाखवायचा राहिलाच की!" म्हणत एकनाथने एका बाजूला उभा करून ठेवलेला बोर्ड पुढे आणून त्याच्यावरचं आवरण दूर केलं. नव्याने रंगवलेल्या प्रशस्त बोर्डावर 'केदारनाथ' या नांवाखाली ठळक अक्षरांत लिहिलं होतं: "महिलांसाठी स्वतंत्र राखीव व्यवस्था!"
४ मे २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ३६
"आमच्या भल्याचा सदोदित विचार करून नेहमीच मोलाचा सल्ला देणाऱ्या या दोन्ही काकांना आम्ही कुटुंबातील वडीलधारेच मानतो!" केदार ठामपणे म्हणाला," त्या नात्याने तुम्ही दोन्ही काकुही आमच्या कुटुंबाचाच भाग आहांत की!" "ठीक आहे, तुमचा हिरमोड होऊं नये म्हणून आम्ही दोघी येऊं;-- पण एका अटीवर!" त्याचा बिनतोड युक्तिवाद ऐकल्यानंतर रजनी समंजसपणाने म्हणाली," पहिल्या दोन स्त्री ग्राहकांकडून बिलाचे पैसे तुम्ही घ्यायचे!" रजनीने सुचवलेला तोडगा पसंत पडून शुभदाही तिच्या मदतीला धांवली, "तुम्ही आम्हांला कुटुंबातील वडीलधा-या म्हणतां ना? मग आमच्या बिलाचे पैसे आशिर्वाद समजून घ्यायचे! केदार आणि एकनाथ, सचोटीने धंदा करतांना लक्षांत ठेवा की तुमच्याकडे आपणहून चालत येणाऱ्या लक्ष्मीला कधीही नाकारायचं नाहीं, तिचा योग्य तो मान राखायचा!" निरुपाय झाल्यासारखे दोघेही गप्प झाले तेव्हां त्यांची समजूत काढण्यासाठी अनंत म्हणाला, "तुमच्या दोन्ही काकु सुचवताहेत ते अगदी योग्य आहे! तुम्ही व्यवसाय आणि पर्यायाने होणारा नफा वाढावा म्हणून हा नवीन उपक्रम सुरूं करणार ना? मग अशा वेळी पहिल्या दोन ग्राहकांना फुकट खाऊ-पिऊं घालून कसं चालेल?" " हवं तर पहिल्या दोन सन्माननीय ग्राहकांना तुम्ही बिलामधे कांही खास सवलत द्या;- पण त्यांच्या शुभहस्ते पैशांचा ओघ सुरु होऊं द्या!" सबनीसांनी सुचना केली.
" ठीक आहे काका, तुमच्या सर्वांच्या सुचनांचा आम्ही नक्की मान राखूं!" केदार हात जोडून सस्मित म्हणाला, "पण तुम्ही दोघांनी येत्या गुरुवारपूर्वी, स्टाॅलवर एक चक्कर टाकून आम्ही आमच्या परीने केलेल्या तयारीमधे कांही कमीजास्त वाटलं तर ते सांगावं अशी आमची इच्छा आहे!" "तुमच्या कार्यक्षमतेवर माझा पूर्ण विश्वास असला तरी अवघ्या ८ / १० दिवसांत तडकाफडकी निर्णय घेऊन तो अंमलात आणण्याची काय-काय तयारी तुम्ही केली आहे ती बघण्याचं औत्सुक्य मलाही खुप आहे!" अनंतने सबनीसांकडे वळून विचारलं,"मग दिनक��राव, आपण केव्हां जायचं 'केदारनाथ' मोहिमेवर?" "मी आत्तांच चला म्हणालो असतो, पण आतां खुप ऊन झालंय ना!" अनंतच्या बोलण्याने हुरूप आलेला केदार कांहीसा हळहळत म्हणाला, "मग आज संध्याकाळी येणार कां?" "मला वाटतं, तुम्ही अजून एक दिवस घ्या आणि तुमच्या मनासारखी तैय्यारी पूर्ण करा!" सबनीस म्हणाले, "अनंतराव, म्हणजे आपल्याला मंगळवारी जातां येईल!" "चालेल;-आम्ही मंगळवारी वाट बघूं!" म्हणत केदार ऊठून ऊभा राहिला आणि एकनाथला खुण करीत म्हणाला, "आम्ही निघतो आतां! स्टाॅल एखाद्या मदतनीसावर अधिक वेळ सोपवणं बरोबर नाही!' केदार आणि एकनाथ गेल्यावर अनंत शुभदाला उद्देशून म्हणाला, " ऐकलास ना आमचा मंगळवारचा प्लॅन! मंगळवारी तुझ्यासाठीही नाश्ता मी 'केदारनाथ' मधूनच घेऊन येईन!" रजनीकडे मोर्चा वळवीत त्याने पुढे विचारलं, "आणि तुमचं काय वहिनी? तुम्हांलाही 'केदारनाथ' चालेल की स्वत: बनवून दिनकररावांना खाऊं घालण्याची तुमची हौस अजून फिटलेली नाही?" " कसली मेली हौस!" रजनी ठासून म्हणाली, "शुभदाला रोज तुम्ही नाश्ता आयता बनवून देतां किंवा मधेच चेंज म्हणून बाहेरून पार्सल आणतां, तेवढं कुठलं माझं भाग्य! आमच्याकडे म्हणजे 'शेळी जाते जिवानिशी, आणि खाणारा म्हणतो वातड!' अशी अवस्था! मंगळवारी तुम्ही माझ्यासाठी 'केदारनाथ' मधून नाश्ता आणलांत तर मीही बापडी एक दिवस थोडा आराम करीन!"
मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास अनंत आणि सबनीस 'केदारनाथ' स्टाॅलवर पोहोंचले तेव्हां गिऱ्हाईकांची सकाळची वर्दळ ओसरली होती! प्रथमदर्शनी 'केदारनाथ' स्टाॅलवर कुठलाही फेरबदल न जाणवल्याने दोघे जरा चक्रावलेच! तेवढ्यांत त्यांना बघून एक मध्यमवयीन स्त्री बाहेर आली आणि नमस्कार करीत म्हणाली, "केदार थोडं सामान आणायला बाहेर गेला आहे तो आतां येईलच" आणि मागील बाजूस वळून तिनं आवाज दिला, "एक्या, अरे तुझे काकालोक आले आहेत. लौकर बाहेर ये" चेहरेपट्टीतील साम्यावरून कयास बांधीत अनंतने विचारलं, "तुम्ही केदारची आई ना? केव्हांपासून यायला लागला स्टाॅलवर?" "झाले चार दीस!मी तर कवाची म्हणत होते, पण पोरं मला येऊं देत नव्हती! मागल्या सप्ताहांत तुम्ही काय पट्टी पढवलीत राम जाणे, पण केदार आपणहून म्हणाला की तूं ये दुकानावर!" समाधानाने हंसत केदारची आई म्हणाली, "मात्र पोरं मला कामाला हात लावूं देत नाहींत! नुसती बसून लक्ष ठेव म्हणत्यात! आतांसुधा मी रिकामी बसून आहे आणि आंत एक्या भांडी घासून धुतो आहे!" तेवढ्यांत टॉवेलला हात पुसत एकनाथ बाहेर आला.त्याच वेळी सामानाच्या पिशव्या लादलेली बाईक घेऊन केदार हजर झाला. "काका, तुम्ही तपासणी करण्यापूर्वी चहा घ्याल ना?" एकनाथने उत्साहानं विचारलं, "चहासो��त खायला काय देऊं?" "आता फक्त चहा! मग निवांतपणे बोलतांना काहीतरी खाऊं!" अनंतने खुलासा केला, "कांहीतरी म्हणजे, तुम्ही फर्माईश कराल ते!" "आणि हो,-- आम्ही इथे जे खाऊं तेच तुमच्या दोन्ही काकुंसाठी पार्सल म्हणून न्यायचं आहे!" सबनीसांनी पुस्ती जोडली.
१८ एप्रिल २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ३५
रविवारची आळसावलेली सकाळ! चहामागोमाग भरपेट नाश्ताही झाल्याने सुस्ती जरा अधिकच वाढली होती! 'रविवार असल्यामुळे आज अनंतची आंघोळ करण्याची घाई असणार नाहीं' हे ओळखून शुभदा आपली आंघोळ आटपून घेण्यासाठी अनंतला तसं सांगून बाथरूममधे गेली होती आणि अनंत सोफ्यावर निवांत आडवरून 'आज दिवसभरात काय-काय करायचं?' याचा विचार करीत होता, तेवढ्यांत डोअरबेल वाजली. विचारांच्या ���ंद्रीतच अनंतने दार उघडलं आणि दाराबाहेर पुष्पगुच्छ घेऊन उभ्या असलेल्या केदार आणि एकनाथना बघून चकीतच झाला! "रविवारी भल्या सकाळी तुम्हांला डिस्टर्ब केल्याबद्दल माफ करा, काका!" नजरानजर होतांच मान किंचित झुकवून अभिवादन करीत केदार म्हणाला, "पण आम्ही तुमचा फार वेळ घेणार नाही!" "आधी आंत तर या!" दिलखुलास हंसून अनंतने त्यांचं स्वागत केलं आणि भिंतीवरील घड्याळाकडे कटाक्ष टाकीत म्हणाला,"आतां दहा वाजायला आलेत;-- म्हणजे सकाळ संपली रे बाबांनो! तरी कसलाही संकोच नको!" आंत आल्यावर दार लोटून घेत एकनाथ म्हणाला "सबनीसकाका घरी असल्यास त्यांना इथेच बोलावता येईल कां? म्हणजे तुम्हां दोघांशी एकत्रच बोलतां येईल!" संभाषणाचे आवाज ऐकून कोण आलं आहे ते बघण्यासाठी शुभदा बाहेर आली तशी चटकन उठून तिला अभिवादन करीत केदार म्हणाला, " गुड मॉर्निंग, काकु! खरं तर काम तुम्हां दोन्ही काकुंकडेच आहे!" "वा रे वा! म्हणजे हे पुष्पगुच्छ खास दोन्ही काकुंसाठी आहेत तर!" शुभदा कांही बोलण्याआधीच अनंत मिस्किलपणे म्हणाला! "नाही, नाहीं!" केदारने घाईघाईने खुलासा केला, "पुष्पगुच्छ तुम्ही आणि सबनीसकाकांसाठी आहेत;-- पण काम मात्र काकुंकडे आहे!" ते ऐकून "मी रजनीला फोन करून दोघांनाही इथे बोलावून घेते" म्हणत शुभदाने लगेच मोबाईलवरून रजनीशी संपर्क साधला!
दहा-बारा मिनिटांत रजनी आणि दिनकर सबनीस हजर झाले! केदार आणि एकनाथना पाहून थोडे चकरावलेले सबनीस म्हणाले, " तुम्ही दोघं आल्याचं वहिनी बोलल्या नाहीत! 'महत्वाचं काम आहे, ताबडतोब या' एवढंच म्हणाल्या!!" "दिनकरराव, या दोघांचं खरं काम दोन्ही काकुंकडेच आहे! 'देखल्या देवा दंडवत' म्हणून त्यांनी आपल्यासाठी पुष्पगुच्छ मात्र आणले आहेत!" अतिशय ��ंभीर चेहर्याने अनंत करीत असलेली थट्टा ऐकून चहाचा ट्रे घेऊन बाहेर येणारी शुभदा म्हणाली, "अहो, किती चेष्टा कराल त्या बिचाऱ्यांची!" केदार आणि एकनाथच्या हातांत चहाचे कप देत तिने पुस्ती जोडली, " तुम्ही लक्ष देऊं नका रे यांच्याकडे;-- दोन्ही काकुंकडे काम काढलंत ना याचा मत्सर वाटतोय बरं तुुमच्या काकाला!" चहा पिऊन झाल्यावर केदार अनंत आणि सबनीसांना उद्देशून म्हणाला, " काका, मागच्या आठवड्यात तुम्ही आमच्या स्टाॅलचा धंदा वाढावा यासाठी ज्या काही नव्या कल्पना सुचवल्या, त्यावर विचार करून आम्ही 'केदारनाथ स्टाॅल'वर स्त्री ग्राहकांसाठी विशेष सोयी देण्याचं ठरवलं आहे!" त्याचं बोलणं ऐकून एकाच वेळी खुष आणि चकीत झालेले सबनीस म्हणाले , "भले शाब्बास! अवघ्या ८-१० दिवसांत एवढा मोठा निर्णय घेतलांत याचं कौतुक करावं तेवढं थोडंच!" "वा,वा! एवढ्या झटपट असा धाडसी निर्णय घेण्याची तुमची धडाडी नक्कीच कौतुकास्पद आहे" चक्क टाळ्या वाजवीत अनंतने आपला आनंद व्यक्त केला, "कधीपासून स्त्री ग्राहकांना खास सोयी देणार आहांत?" "तेच तर सांगायला आलोत, काका!" एकनाथ उत्साहाने म्हणाला,"पण त्याआधी तुमचे आभार मानण्यासाठी आम्ही आणलेले पुष्पगुच्छ स्वीकारा आणि आशिर्वाद द्या!" पुष्पगुच्छ देऊन पायां पडायला वाकलेल्या केदार-एकनाथला अर्ध्यावर थांबवीत अनंत म्हणाला, "खरं तर याची गरज नव्हती,- पण तुमच्या भावनांचा प्रामाणिकपणा आम्हांला कळतो आहे!" दोघांचे हात प्रेमभराने दाबीत सबनीस म्हणाले, "आम्हां सर्वांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत हमेशा असतील याची खात्री बाळगा!"
"काका, येत्या गुरुवारी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर स्त्री ग्राहकांसाठी विशेष सोयींचा उपक्रम सुरु करायची आमची इच्छा आहे!" केदार सांगू लागला, "---त्यासाठी आमच्या पहिल्या दोन सन्माननीय ग्राहक या दोन्ही काकु असतील असं आम्हीं ठरवलं आहे!" "काकु, तुम्ही प्लीज नाहीं म्हणूं नका!" एकनाथने विनम्रपणे दोन्ही हात जोडून शुभदा आणि रजनीला विनंती केली. त्यांचा हा अनपेक्षित प्रस्ताव ऐकून आश्चर्यचकित झालेल्या दोघींनाही काय बोलावं ते सुचेना! पण कांही क्षणांनी त्या धक्क्यातून स्वत:ला सावरीत शुभदा म्हणाली, " केदार आणि एकनाथ, तुम्ही दिलेला हा बहुमान कुणालाही आवडेल! पण तरीही हा बहुमान तुम्ही तुमच्या कुटुंबातील वडीलधा-या महिलेला देणं अधिक योग्य ठरेल असं मला मनापासून वाटतं!"
३० मार्च २०२३
0 notes